Mumbai safer than london UK-Based content creator Video goes Viral : शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीबद्दल आपण बऱ्याचदा ऐकतो, अशातच एका ओनत सियाहान (Onat Siahaan) नावाच्या कंटेन्ट क्रिएटरने मुंबई आणि लंडन या दोन शहरातील सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षिततेची तुलना करणारा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांचे मत असेल की युनायटेड किंग्डमची राजधानी भारताच्या आर्थिक राजधानीपक्षा जास्त सुरक्षित असेल, पण सियाहानच्या मते त्याचा अनुभव यापेक्षा काहीसा वेगळा होता. त्याने दावा केला आहे की मुंबईच्या तुलनेत त्याला लंडनमध्ये कमी सुरक्षित वाचले, विशेषतः फोन चोरीच्या घटनांबाबत. दरम्यान या सोशल मीडिया पोस्टची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
त्याने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये मुंबईत आणि लंडनमध्ये त्याच्या सार्वजनिक ठिकाणी फोन वापरण्याच्या पद्धतीमधील फरक दाखवून देताना दिसत आहे.
जगभरातील ३० पेक्षा जास्त राजधानीच्या शहरांमध्ये फिरल्यानंतर , जगातील सर्वात विकसित शहरांपैकी एका शहरात माझा फोन मोकळेपणाने वापरता न येणे ही गोष्ट मला आजही धक्कादायक वाटते. खरं सांगायचं झालं तर, याबाबतीची परिस्थिती दिवसेंदिवस अजूनच बिघडतच चालली आहे,” असे सियाहानने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले.
“या व्हिडिओमधील लंडनची क्लिप ही गेल्या दोन वर्षांपासून मला माझ्यासाठी सर्वात सुरक्षित वाटणाऱ्या भागांपैकी एका भागात शूट केली होती. पण शूट केल्यानंतर लगेचच, बाईकवरून गस्त घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी येथे फोन चोरीच्या घटना वाढल्याने मला सावध राहण्याचा इशारा दिला,” असेही त्याने कॅप्शनमध्ये सांगितले आहे.
तसेच या पोलिसांनी असेही सांगितले की तुम्ही फक्त गवतावर हताता फोन घेऊन बसलात तरी ते येऊन तुमचा फोन हिसकावून घेऊन जातील, असाही दावा या कंटेन्ट क्रिएटरने केला आहे.
त्याने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये त्याचे दोन वेगवेगळ्या शहरातील हावभाव कसे बदलतात हे पाहणे मजेशीर आहे. मुंबईमध्ये तो बिनधास्त चालताना दिसतो आहे, तर लंडनमध्ये तो घाबरत आणि सतत इकडे तिकडे पाहत चालताना दिसत आहे.
या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी या कंटेन्ट क्रिएटरशी आपण सहमत असल्याचे म्हटले आहे. तसेच अनेकांनी लंडनमध्ये पाकिट किंवा एखादी वस्तू चोरीला गेल्याचे त्यांचे अनुभव देखील सांगितले आहेत.
“माझ्या उभ्या आयुष्यात माझे एकदाच पाकिट मारण्यात आले, तेही लंडनमध्ये… आणि मी भारत, दक्षिण आफ्रिका आणि कोलंबियामध्ये राहिलो आहे,” असे एका यूजरने म्हटले आहे.
“पाच वर्षांपूर्वी, २० ऑगस्ट रोजी सायकलवर आलेल्या व्यक्तीने ब्रिटीश म्युझियमच्या समोरच दिवसाढवळ्या माझ्या हातातून माझा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. माझा फोन वाचला. सुदैवाने, माझी फोनवर पकड घड्ड होती आणि माझा फोन माझ्याकडेच राहिला,” असे आणखी एका व्यक्तीने म्हटले आहे.