सोशल मीडियावरील व्हिडिओ या ना त्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी हलकेफुलके मनोरंजन करणारे, तर कधी डोळ्यात पाणी आणणारे व्हिडिओ लक्ष वेधून घेत असतात. असे अनेक व्हिडीओ आपण पाहिले असतील ज्यामध्ये वृद्ध व्यक्ती त्यांच्या उदरनिर्वाहासाठी काम करताना दिसतात. असे व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांच्या हृदयात झपाट्याने स्थान निर्माण करतात. तसेच अनेक लोक आहेत जे या वृद्धांच्या मदतीसाठी पुढे येतात. असाच नागपूरमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहे. एक वृद्ध व्यक्ती आपल्या औषधासाठी आणि उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर पोहे चना चिवडा विकताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

व्हिडिओत एक वृद्ध व्यक्ती सायकलवर छोटी टोपली बांधून पोहे चना चिवडा बनवण्याचे सर्व साहित्य घेऊन जाताना दिसत आहे. नागपुरातील गांधीबाग आणि इतवारीच्या रस्त्यांवर संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत पोहे चना चिवडा विकतात, असे या व्हिडिओद्वारे आणि त्याच्या कॅप्शनद्वारे सांगण्यात आले आहे. यासोबतच त्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक शेअर करून त्यांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडिओ ब्लॉगर अभिनव जेसवानीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबतच ही वृद्ध व्यक्ती औषधोपचार व घरखर्च भागवण्यासाठी पोहे चना चिवडा विकण्यासोबत रात्रीच्या वेळी महाजनवाडीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.