सैबेरियाची कडाक्याच्या थंडीत रोज जगण्यासाठी माणसांची धडपड सुरू असते. उणे १०- १५ अंश सेल्शिअस तापमानाच्या वार्ता तर सोडाच पण येथे थंडीतही पारा उणे ५० अंश सेल्शिअसच्याही खाली असतो. अशा काडाक्याच्या थंडीत १३ दिवस प्रवास करणारी निधी तिवारी ही पहिली भारतीय महिला ठरली. सैबेरियाच्या याकुत्स्क गावातून तिने आपल्या साहसी प्रवासाला सुरूवात केली अन् गोठवणा-या थंडीत ती तग धरून राहिली.
VIDEO : कडाक्याच्या थंडीत उकळलेले पाणीही सेकंदात गोठले
साहसी प्रवास करणा-या काही मोजक्या लोकांमध्ये भारताची निधी तिवारी हिचे नाव आता गणले जाऊ लागले. आपली जीप घेऊन तिने भारताच्या अनेक दुर्गम भागात प्रवास केला. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या दोन मैत्रिणींसोबत मिळून तीन महिन्यांत दिल्ली ते लंडन असा प्रवास केला होता. एकूण २४ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तिला ९७ दिवस लागले होते.
यानंतर तिने सैबेरियातल्या अत्यंत कडाक्याच्या थंड प्रदेशात एकटीने प्रवास केला. तेरा दिवस तिने उणे ५९ अंश सेल्शिअस तापमान असलेल्या सैबेरियाच्या अनेक गावांतून प्रवास केला. बरं हा प्रवास काही सोपा नव्हता. कारण येथे जीवन मरणाचा प्रश्न होता. पण जिथे साहस आणि रोमांच नसेल तो प्रवास कसला? ‘हफिंग्टन पोस्ट’ला दिलेल्या एका मुलाखतीत निधीने सांगितले की ‘हा प्रवास खूपच रोमांचकारी होता. येथे प्रत्येक गावातील तापमान हे उणे ५० अंश सेल्शिअसच्याही खाली होते. रात्रीचे तर सोडाच पण दिवसाही इतके दाट धुके असायचे की काहीच दिसायचे नाही. त्यातून रस्त्यावर बर्फ आणि निसरडे रस्ते होते यात एक छोटीशी चूक आणि मृत्यूने तुम्हाला मिठी मारलीच समजा’. निधीने अकराव्या वर्षी हिमालय सर केला होता. जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी सफर करण्याची प्रेरणा आपल्याला आईपासून मिळाली असेही तिने सांगितले. कडाक्याच्या थंडीत सैबेरियामध्ये प्रवास करणारी निधी ही पहिली भारतीय महिला ठरली.