आपली कला दाखवण्याचे सोशल मीडिया हे उत्तम व्यासपीठ आहे. एखाद्याचे टॅलेन्ट आवडले तर त्या व्यक्तीला अक्षरश: डोक्यावर चढवायलाही नेटिझन्स मागे पुढे पाहत नाहीत. आता हेच बघा ना ओडिशाच्या या विद्यार्थिनींने आपल्या नृत्याविष्काराने सगळ्यांनाच वेड लावलंय. कॉलेज कँम्पसमधला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून युट्यूबवर थोड्याथोडक्यांनी नाही तर तब्बल १ कोटींहून अधिक लोकांनी तो पाहिलाय. सुरूवातीला एक तरूण विद्यार्थिनी आपल्या नृत्याने कॅम्पसमधल्या अनेकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेते, पुढे तिच्या आणखी दोन मैत्रिणी तिला साथ देतात, असं करता करता तिच्या मैत्रिणींची संख्या वाढत जाते अन् साऱ्या जणी मिळून एकापेक्षा एक हटके नृत्य सादर करून बघ्यांना मोहून टाकतात. हा व्हिडिओ जितक्या लोकांनी पाहिलाय तेवढ्याच अधिक प्रतिक्रियाही या व्हिडिओवर पाहायला मिळत आहे. नेटिझन्सने या मुलींच्या कलागुणांचे भरभरून कौतुक केलंय.