Oracle lays off employees in cloud division : गेल्या अनेक दिवसांपासून लिंक्डइन आणि रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ओरॅकल या अमेरिकेतील प्रसिद्ध टेक कंपनीत नोकर कपात होणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर कंपनीने कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढण्यास सुरूवात केली आहे. नोकरी गमावलेल्या कर्मचार्‍यांशी बोलल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाने याबद्दलचे वृत्त दिले आहे. या कर्मचाऱ्यांना झूम कॉलवर नोकरीवरून काढण्यात आल्याचे समोर आले आहे.

आउटलेटने दिलेल्या वृत्तानुसार, नोकरीवरीन काढल्याची घोषणा ही प्रोजेक्ट अपडेट्सच्या नावाखाली केली जात आहे. त्यामुळे अशा आशयाचे ईमेलमुळे कर्मचाऱ्यांची चिंता वाढत आहे. या कंपनीमध्ये ३०,००० कर्मचारी काम करतात आणि पुढचा क्रमांक आपला लागू शकतो या सततच्या भीतीखाली ते काम करत आहेत.

२० मिनिटांत सगळं संपलं

“आपल्याला माहिती असलेल्या नोकऱ्या आता अस्तित्वात नाहीत,” असे एका डेटाबेस टीममध्ये काम करणाऱ्या पीडित कर्मचाऱ्याने सांगितले. या कर्मचाऱ्याने पुढे सांगितले की, “हे सर्व २० मिनिटांपेक्षा कमी वेळेत संपलं- एक झूम इन्व्हाइट आले, कॉलवर मॅनेजर आणि एचआर प्रतिनिधी होते, ज्यांनी मला सांगितलं की हे माझ्या कामगिरीमुळे नाही तर पूर्णपणे व्यावसायिक कारणांमुळे हे होत आहे.” पुढे तो म्हणाला, “माझा ॲक्सेस खूपच लवकर काढून घेण्यात आला. माझे आरएसयू (RSUs) फेब्रुवारीमध्ये मिळायचे होते, पण मी ते लगेच गमावणार आहे.”

दुसऱ्या एका नोकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्याने सांगितले की त्याचे पालक त्याच्यावर अवलंबून आहेत. “माझे पालक माझ्यावर अवलंबून आहेत आणि त्यांना याबद्दल सांगणे सर्वात कठीण काम होते”

तिसऱ्या एका नोकरी गमावलेल्या व्यक्तीने सांगितले की, बिझनेस अपडेटवर चर्चा करण्यासाठी आलेल्या कॉलवर त्याला नोकरीवरून काढण्यात आले आणि तो आजूही धक्क्यात आहे.

“मी आउटप्लेसमेंट सेवांसाठी साइन अप केले आहे. पण त्यासाठी थोडा वेळ लागेल. एचआरने फक्त आम्हाला मिळणाऱ्या सेव्हरन्सबद्दल सांगितले. ही संपूर्ण प्रक्रिया खूप थंड वाटली आणि माझ्यासाठी धक्कादायक होती.”

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार ओरॅकल कंपनीत क्लाउड युनिटमधील कर्मचाऱ्यांना काढून टाकले जात आहे आणि डेटा सेंटर डायनामिक्सच्या रिपोर्टनुसार याचा परिणाम भारत आणि अमेरिका अशा दोन्हीकडील टीमवर होईल. ओरॅकल क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर (ओसीआय) डिव्हीजनमधील लोकांना काढून टाकले जात आहे, ज्यामध्ये अभियंते, डेटा सेंटर ऑपरेटर्स आणि एआय/एमएल फंक्शन्स यांचा समावेश आहे.

काही रिपोर्ट्सनुसार भारतातील एकूण ओरॅकल कर्मचाऱ्यांपैकी १० टक्के लोकांना याचा फटका बसला आहे. काही कर्मचारी दावा करतात की ३,००० लोकांना फटका बसला आहे. २०१७ मध्ये या कंपनीने भारतात ४०,००० लोकांना कामावर घेतले होते.

गेल्या महिन्यात ऑरॅकलने भारतातील सुमारे १० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले, ज्यासाठी त्यांनी अधिकृत कारण रिस्ट्रक्चरिंग असे सांगितले. यानिर्णयाचा भाग म्हणून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, क्लाउड सर्व्हिसेस आणि टेक्निकल सपोर्ट व्हर्टिकल्स या विभागांना सर्वाधिक फटका बसला असे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

रेडिट थ्रेड

ओरॅकल लेऑप्स -ऑगस्ट/सप्टेंबर २०२५ (Oracle layoffs – Aug/Sep 2025) या रेडिटवरील थ्रेडमध्ये २२ लोकांनी आपल्याला फटका बसल्याचे मान्य केले आहे.

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट संबंधीत जबाबदाऱ्या संभाळणाऱ्यांना सर्वाधिक फटका बसला, त्यानंतर कन्सल्टंट आणि टेक्निकल आर्किटेक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्यांना, असे या थ्रेडमध्ये म्हटले आहे.

नोकरी गमावलेल्या बहुतांश कर्मचाऱ्यांना सेव्हरन्स पॅकेज देण्यात आले, ज्यामध्ये ज्येष्ठतेच्या आधारावर, लोकेशन आणि कायदेशीर बाबी लक्षात घेऊन फरक होता.

किती काळ काम केले आणि तुमच्याकडे कोणत्या लेव्हलची जबाबदारी होती यानुसार सेव्हरन्स पॅकेजमधेये १ ते १२ महिन्यांपर्यंतच्या पगाराचा समावेश होता.

ऑस्टिन, कॅनसास सिटी, भारत, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, रिमोट सेटअप आणि इतरही अनेक ठिकाणी याचा फटका बसला, ज्यामुळे ही नोकर कपात जगभरात सुरू असल्याचे दिसून आले.