गरीब आणि श्रीमंत यातील दरी कधीही भरून न निघणारीच आहे. अनेक देशांत असे धनाड्य आहेत की त्यांच्याकडील संपत्तीने ते गरिब देश अधिक सहज विकत घेऊ शकतात. काही दिवसांपूर्वी एक अहवाल प्रकाशित झाला होता. यात जगातील अशा व्यक्तींची नावे दिली होती ज्यांच्या कंपन्यांचे उत्पन्न हे काही देशांच्या एकूण उत्पन्नांहूनही अधिक होते. यावरून तुम्ही त्यांच्या मालकांकडे असणा-या संपत्तीची कल्पना करू शकता. यातच ‘ऑक्सफम’ने सोमवारी एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार १ टक्के भारतीय अब्जाधिशांकडे देशातील जवळपास ५८ टक्के संपत्ती असल्याचे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑक्सफमच्या अहवालानुसार देशात ५८ असे श्रीमंत आहेत ज्यांकडे देशातील ७० टक्के लोकांकडे मिळून जितकी संपत्ती नसेल त्याहूनही अधिक संपत्ती आहे. देशातील आयटी कंपन्या या दिवसेंदिवस श्रीमंत होत आहेत. त्यामुळे भारतात गरिब श्रीमंत दरी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. इतर कंपन्यांपेक्षा या आयटी कंपन्या जवळपास ४१६ पटींनी जास्त नफा कमावत आहेत म्हणून श्रीमंत आणि गरीब अशी तफावत भारतात पाहायला मिळत आहे. म्हणूनच देशातील १० टक्के श्रीमंतांकडे ८० टक्के संपत्ती असल्याचे या अहवालात म्हटले आहे. १९८८ ते २०११ या काळात देशातील १० टक्के गरीबांचे वार्षिक उत्पन्न हे फक्त २ हजार रुपयांनी वाढले आहे तर या तुलनेत देशातील श्रीमंतांच्या वार्षिक उत्पन्नांत मात्र ४० हजार रुपयांची वाढ होत आहे. त्यामुळे भारतातील गरिबांच्या आर्थिक स्थितीत कोणताही फरक दिसत नाही तर श्रीमंत मात्र अधिक श्रीमंत होताना दिसत आहेत.

तर दुसरकीडे ऑक्सफमने जगातील अर्ध्याधिक संपत्ती ही फक्त आठ व्यक्तींच्या हाती एकवटली आहे असेही म्हटले आहे. त्यात अमेरिकेतल्या ६ गर्भश्रीमंताचा आणि  मेक्सिकोमधल्या एक आणि स्पेनमधल्या एका व्यवसायिकाचा समावेश असल्याचे म्हटले आहे. जगातील ५० टक्के गरीबांची संपत्ती एकत्र केली तर त्यापेक्षाही अधिक संपत्ती ही या आठ गर्भश्रींमतांकडे असल्याचे या अहवालात म्हटले आहे. यात बिल गेट्स, मार्क्स झकेरबर्ग आणि मायकल ब्लूमबर्ग व्यतिरिक्त आणखी पाच जणांचा समावेश आहे. ही तफावत आणखी वाढत जाणार असल्याचेही म्हटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oxfam inequality report says one percent of indians own 58 of countrys wealth
First published on: 16-01-2017 at 11:07 IST