सोशल मीडियावर ‘पावरी गर्ल’ नावाने चर्चेत आलेली पाकीस्तानी मुलगी दानानीर मोबिन उर्फ ​​गीना आता पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आलीय. ‘पावरी गर्ल’ दानानीर मोबिनचा आणखी नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. तिच्या या नव्या व्हिडीओमध्ये ती गाणं गाताना दिसून येतेय. तिच्या जादुई आवाजाने सोशल मीडियावर एकच धुमाकूळ माजला आहे. तिचं हे नवं गाणं सध्या बरंच गाजत असून यावर वेगवेगळे मीम्स देखील व्हायरल होण्यास सुरूवात झाली.

‘पावरी गर्ल’ दानानीर मोबिन हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा नवा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये ती २०१७ साली रिलीज झालेल्या ‘पंजाब नहीं जाऊंगी’ या पाकीस्तानी फिल्ममधलं गाणं गाताना दिसून येतेय. “खोया जो तू, होगा मेरा क्या? माझ्या आवडत्या पाकिस्तानी चित्रपटांपैकी हे मधुर गाणं…पंजाब नहीं जाऊंगी!” अशी कॅप्शन देत तिने गाणं गातानाचा नवा व्हिडीओ शेअर केलाय. तिच्या ‘पावरी’ व्हिडीओप्रमाणेच हा नवा गाण्याचा व्हिडीओ लोकांच्या पसंतीस पडत आहे.

तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. जवळपास पाच लाखांपेक्षा जास्त लोकांनी तिचं हे नवं गाणं पाहिलंय. ‘पावरी गर्ल’ दानानीर मोबिन हिने गाणं गाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सुद्धा ती ‘तेरा माझा रिश्ता पुराना’ या गाण्याच्या व्हिडीओमुळे चर्चेत आली होती.

गेल्या फेब्रूवारी महिन्यात एका रोड ट्रीप दरम्यान ‘ये मैं हू, ये हमारी कार हैं, और यहॉं हमारी पावरी चल रही हैं’ या तिच्या डायलॉगमुळे ती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर अगदी बॉलिवूड सेलिब्रिटी पासून ते क्रिकेटर्सपर्यंत सर्वांवर तिच्या या डायलॉगची जादू चढली होती. अगदी तशाच पद्धतीने तिच्या या नव्या गाण्याची जादू सध्या नेटिझन्सवर चढली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहे ‘पावरी गर्ल’?

‘पावरी गर्ल’ दानानीर मोबिन ही १९ वर्षीय मुलगी फूड, मेकअप आणि फॅशनवर आधारीत वेगवेगळे व्हिडीओ तयार करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे १.६ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि सोशल मीडियावर तिच्यावरील विनोद आणि मीम्स व्हायरल होत असतात. तिच्या या नव्या गाण्याच्या व्हिडीओवर युजर्स कमेंट्स करत तिच्या मधूर आवाजाचं कौतुक करताना दिसून येत आहेत. ‘सुंदर आवाज’, ‘माशा अल्लाह’, ‘जादुई आवाज’ असं लिहित युजर्सनी तिच्या नव्या गाण्याच्या व्हिडीओवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय.