पाळीव प्राणी आणि पक्षी पाळणारे पाळंदे लोक हे आपल्या देशात अनेक आहेत. अनेकजण आपल्या पाळीव प्राण्यावर, पक्ष्यावर अगदी मनापासून प्रेम करतात. आता अशीच एक घटना समोर आली आहे. आपला पाळीव पोपट हरवल्याने त्याच्या मालकाने शहरभर त्याचे पोस्टर लावले आहेत आणि तो शोधून देणाऱ्याला बक्षीसही जाहीर केलं आहे. पाळीव पोपट हरवल्याने त्याचा मालक आणि त्याच्या घरातले सगळेच लोक अस्वस्थ झाले त्यामुळे त्यांनी अखेर या पोपटाचे पोस्टर्स शहरभर लावले आहेत.
कुठे घडली आहे ही घटना?
ही घटना मध्य प्रदेशातल्या दमोहमध्ये घडली आहे. दमोह शहरात कोतवाली भागातल्या इंद्रा कॉलनीत राहाणाऱ्या सोनी यांच्या कुटुंबाकडे मागच्या दोन वर्षांपासून पोपट पाळला होता. संपूर्ण कुटुंबाला हा पोपट आवडत होता. संध्याकाळी त्या पोपटाला पिंजऱ्यातून बाहेर काढून फिरवूनही आणलं जात असे. बुधवारी संध्याकाळीही पोपटाला बाहेर फिरायला नेण्यात आलं होतं. पोपटाचे मालक त्या पोपटाला खांद्यावर बसवून फिरायला घेऊन निघाले. त्यावेळी रस्त्यावर पोपटाकडे पाहून एक कुत्रा भुंकू लागला. यानंतर पोपट कुत्र्याच्या भीतीने उडाला. एका झाडाच्या फांदीवर पोपट जाऊन बसला पण त्यानंतर तो हरवला. म्हणून आता सोनी कुटुंबाने जागोजागी या पोपटाचे पोस्टर्स लावले आहेत. काही नेटकऱ्यांनी यासंबंधीचा व्हिडीओही ट्वीटरवर पोस्ट केला आहे.
पोपट शोधून देणाऱ्याला १० हजारांचं बक्षीस
संपूर्ण रात्रभर पोपटाचा शोध सोनी कुटुंबाने घेतला. मात्र पोपट काही सापडला नाही. त्यानंतर त्यांनी पोपटाचं पोस्टर तयार केलं त्याला शोधून देणाऱ्याला १० हजारांचं बक्षीसही जाहीर केलं. एक ऑटो रिक्षा घेऊन त्यातून पोपट हरवला आहे तो शोधून देणाऱ्याला १० हजारांचं बक्षीस देऊ अशा घोषणाही करण्यात येत आहेत. अनेकांना ही घोषणा ऐकून आश्चर्य वाटतं आहे तर अनेकांना या कुटुंबाचं पक्षी प्रेम पाहून सुखद धक्काही बसतो आहे. सध्या पोपट शोधून देणाऱ्याला आम्ही १० हजारांचं बक्षीस जाहीर केलं आहे पण कुणी जास्त पैसे घेऊन पोपट शोधून देणार असेल तर आम्ही ते पैसेही द्यायला तयार आहोत असं सोनी कुटुंबाने म्हटलं आहे. आज तकने या विषयीचं वृत्त दिलं आहे.