Patient Sexually Harassed Indian Nurse: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका नव्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आपली शुश्रूषा करणाऱ्या नर्ससह अश्लील भाषेत बोलून तिचा विनयभंग करत असल्याचे दिसतेय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हा प्रकार भारतीय रुग्णालयात घडल्याचे सांगण्यात आले आहे. रुग्ण हा आफ्रिकेचा रहिवासी असल्याचे त्याने स्वतः म्हटल्याचे ऐकू येतेय तर ही नर्स स्वतःला भारतीय म्हणत आहे. सदर व्हिडीओ सुद्धा त्या रुग्णानेच रेकॉर्ड केला असून नर्स त्याची सेवा करत असताना तो अश्लील पद्धतीने तिच्याशी बोलताना ऐकू येतोय. सुरुवातीला नर्सने त्याला उत्तर देणेही टाळले होते पण तरीही तो शांत न राहिल्याने तिने त्याला नम्र शब्दात आपण भारतीय असल्याचा अभिमान आहे असे म्हटले. यावर पुढे त्या रुग्णाचं बोलणं ऐकून नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. ” या नर्सला कदाचित कळलं नसेल की रुग्ण तिचं एका प्रकारे लैंगिक शोषण करत आहे”, अशा पद्धतीच्या कमेंट्स व कॅप्शनसह हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया..

व्हायरल व्हिडिओमध्ये, स्वतःला आफ्रिकेचा रहिवासी म्हणणारा रुग्ण नर्सला म्हणतो की, “तुम्हाला आफ्रिका आवडायलाच पाहिजे,” ज्यावर नर्स पटकन उत्तर देते, “नाही, मला आफ्रिका आवडत नाही.” यावर तो रुग्ण म्हणतो की जर मी माझे कपडे काढले तर तुला आफ्रिका नक्की आवडेल, यावर नर्सने उत्तर न दिल्याने तो पुढे म्हणाला तसंही इंडियात काही चांगलं नाहीये (इंडिया नो गुड) ज्यावर मात्र नर्सने रागाने उत्तर दिले. ती म्हणाली, “तुम्ही भारत चांगला नाही म्हणता आणि उपचार घ्यायला इथंच येता.” यावर पुन्हा रुग्ण म्हणाला की, “भारत कदाचित उपचारांसाठी चांगला असेल पण बेडवर नाही”

इतकंच नाही तर हा रुग्ण तिला अश्लील भाषेत आपल्याबरोबर बेडमध्ये येण्यासाठी सुद्धा बोलवू लागतो. हे सगळं घडत असताना नर्सने त्या रुग्णाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आपले काम पूर्ण केले पण अशा प्रकारे नर्सला त्रास झाल्यास तिने लगेचच काम थांबवून निघून जायला हवे होते अशीही प्रतिक्रिया लोकांनी दिली आहे. तर काहींनी नर्सच्या कामाप्रतीच्या व कर्तव्य पूर्ण करण्याच्या निष्ठेचं कौतुक केलं आहे.

हे ही वाचा << नागपूरच्या डॉली चहा विक्रेत्याची बिल गेट्सनाही पडली भुरळ; VIDEO शेअर करत म्हणाले, ‘साधा कप चहा…’

दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सदर रुग्णालय कोणते आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. नेटकऱ्यांनी या रुग्णाला लगेचच अटक करण्यात यावी अशा मागणी केली आहे.