Woman Smoking In Icu : सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी सरकारने अनेक राज्यांमध्ये एम्स रुग्णालये सुरू केली आहेत. या रुग्णालयात अनुभवी डॉक्टरांकडून रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. ज्या आजारांवर लाखोंचा खर्च येतो अशा आजारांवर एम्समध्ये मोफत उपचार केले जातात. पण या सुविधेचा वापर कसा करावा हेही लोकांना कळत नसल्याची एक घटना समोर आली आहे. ही घटना पाहून तुमचाही संताप होईल. घटनेत आयसीयूमध्ये भरती असलेली एक वृद्ध महिला चक्क विडी ओढताना दिसतेय. ज्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पटना एम्स रुग्णालयातील असल्याचे सांगितले जात आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल असल्याचे दिसून येतेय. खासगी हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करून घेण्यासाठी लोकांकडून भरमसाठ पैसे घेते जातात, पण या एम्स रुग्णालयात फुकटात उपचार घेणारी ही महिला बेडवर बसून विडी ओढताना दिसतेय. यावेळी लोकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिने चिडून लोकांना ओरडायला सुरुवात केली, यानंतरही ती कोणाचेही न ऐकता आरामात विडी ओढत बसली.
यावेळी आजूबाजूच्या लोकांनी पुन्हा महिलेला अडवलं आणि विडी फेकायला सांगितली. यानंतर तिला स्वत:ला दम लागल्याने तिने पंलगाच्या काठावर विडी विझवत फेकली.
यावेळी उपस्थित असलेल्या एका मुलीने तिचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओमध्ये लोक डॉक्टरांना बोलवा म्हणत वृद्ध महिलेला घाबरवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, मात्र तोपर्यंत महिलेची पूर्ण विडी ओढून झाली होती. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वृद्ध महिलेचे हे कृत्य संतापजनक असल्याचे काहींनी म्हटले आहे. तर काहींनी लिहिले की, असे करणे आसपासच्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकते. विडी किंवा सिगारेटमुळे हॉस्पिटलमधील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे अनेकांच्या जीव धोक्यात घालणाऱ्या या महिलेच्या कृत्यावर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.