‘स्नॅपचॅट हे अ‍ॅप फक्त श्रीमंतांसाठी आहे आणि भारत व स्पेनसारख्या गरीब देशांत त्याचा विस्तार करण्याचा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इव्हान स्पिगेल यांचा अजिबात मानस नाही’, असे याच कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याचे वक्तव्य रविवारी समाजमाध्यमांवर पसरल्याने भारतीय नेटकऱ्यांमध्ये संताप पसरला आणि स्पिगेल यांना या संतापाचे धनी व्हावे लागले. मात्र, याचा फटका बसला तो या प्रकरणाशी काहीही संबंध नसलेल्या ‘स्नॅपडील’ या अ‍ॅपला आणि तोही या दोन अ‍ॅपच्या नावांमध्ये असलेल्या बऱ्यापैकी सारखेपणामुळे.. !

या प्रकरणाची सुरुवात झाली ती ‘स्नॅपचॅट’चा माजी कर्मचारी अँथोनी पॉम्पलिनो याच्या एका पोस्टने. ‘कंपनीच्या विस्ताराबाबत एका बैठकीत स्पिगेल यांच्याकडे आपण विचारणा केली होती. त्यावर, भारत व स्पेनसारख्या गरीब देशांत विस्तार करण्याचा आपला मानस नाही, असे उत्तर स्पिगेल यांनी तेव्हा दिले होते’, असा दावा अँथोनी याने त्याच्या पोस्टमध्ये केला. त्यासरशी भारतीय नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. स्पिगेलविरोधात जळजळीत शब्दांतील टीका समाजमाध्यमांवर फिरू लागली. ट्विटरवर सर्वाधिक चर्चेच्या विषयांमध्ये हा विषय अलगद जाऊन बसला. त्याचसोबत अनेकांनी ‘स्नॅपचॅट’च्या नावाने बोटे मोडत ते अ‍ॅप आपल्या मोबाइलवरून काढून टाकले. त्याचे मानांकन घटवले.

या सगळ्याचा फटका अनवधानाने बसला तो ‘स्नॅपडील’ या खरेदी-विक्रीचा ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या अ‍ॅपला.  हे प्रकरण ‘स्नॅपचॅट’चे आहे.. ‘स्नॅपडील’चे नव्हे, याचे भानच न राहिल्याने अनेकांनी हा अ‍ॅप आपल्या मोबाइलवरून काढून टाकला. मात्र, या चुकीची छायाचित्रे समाजमाध्यमांवर दुपारनंतर फिरू लागल्यानंतर अनेकांना त्याची जाणीव झाली. ती जाणीव झाल्यानंतर मात्र ग्राहकांनी स्नॅपडीलचे अ‍ॅप पुन्हा डाऊनलोड करून घेतले.

तसे वक्तव्य केलेच नाही..

भारताबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप असलेले स्नॅपचॅटचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्पिगेल यांनी मात्र ‘मी असे कधीही बोललेलो नाही’, असा दावा केला आहे.