Phone vendor turns old iPhone into New iPhone 17: स्मार्टफोन उद्योगात जागतिक स्तरावर वर्चस्व गाजवणाऱ्या अॅपलने अलिकडेच आयफोन १७ सिरीज लाँच केली. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह चार नवीन मॉडेल्सचा समावेश आहे. जगभरातील आयफोन युजर्स प्री-बुकिंगसाठी प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, स्थानिक फोन विक्रेते उत्साही ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काही सुधारणांसह जुना आयफोन अगदी नवीन आयफोन १७ मध्ये रूपांतरित करण्याच्या वेगवेगळ्या युक्त्या शोधत आहेत.
एक्सवरील व्हायरल व्हिडीपैकी एका व्हिडीओत, एका फोन विक्रेत्याने काही मिनिटांतच आयफोन १२ला अगदी नवीन आयफोन १७ प्रो मॅक्समध्ये कसे रूपांतरित केले ते दाखवले आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, त्याने जुन्या आयफोनच्या बॉडीमध्ये काही बदल केले आणि त्यावर चमकदार नारंगी रंगाचं स्टीकर लावलं. हा रंग आयफोन १७च्या मालिकेतील रंगाशी अगदी तंतोतंत मिळणारा आहे.
फोन विक्रेत्याने नेमके काय केले?
फोन विक्रेत्याने कॅमेरा आणि फ्लॅशलाइटची एक नवीन लेआउट फ्रेम जोडली आहे. ही फ्रेम १७ सिरीजमधल्या आयफोनसारखीच आहे. फोनच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल केले नसले तरी त्याने फोनच्या लूकमध्ये केलेल्या सुधारणांमुळए आयफोन १२ हा हुबेहूब आयफोन १७ दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे आणि त्याला १ लाख२० हजारांहून अधिक व्ह्यूज आहेत. नेटकऱ्यांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने विचारले की, फ्लॅशलाइट चालेल का? कारण विक्रेत्याने फोनच्या प्रत्यक्ष फ्लॅशलाइटला कॅमेऱ्यांभोवती लावलेल्या लेआउट फ्रेमने झाकले होते. नवीन आयफोन १७ मध्ये मागील फोनप्रमाणे कॅमेऱ्याजवळ फ्लॅशलाइट नाही. जर युजर्सनी अशा पद्धतीने त्यांचे जुने आयफोन नवीन १७ मालिकेच्या फोनमध्ये रूपांतरित केले तर ते फ्लॅशलाइट चालू करू शकणार नाहीत. दुसऱ्या युजरने लिहिले की, ते बनावट प्रो मॅक्स सारखे दिसते. तर आणखी एका युजरने म्हटले की, ही फक्त समस्या आहे आणि आणखी लोकांसोबत स्कॅम होणार आहे.