Oracle Employee Turned Entrepreneur India: ऑरॅकल या मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीत ऑपरेशन्स हेड म्हणून काम केलेल्या एका व्यक्तीची सोशल मीडिया पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये या व्यक्तीने सांगितले की, त्यांनी २०१९ मध्ये ऑरॅकलमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून फालूदा विकण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्या मूळ गाव तमिळनाडूतील करूर येथे परतले. जेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली होती. पण आज, सहा वर्षांनंतर प्रदीप कन्नन नावाच्या या व्यक्तीचे भारत आणि दुबईमध्ये १८ आउटलेट्स आहेत आणि ते एक यशस्वी व्यवसाय चालवत आहेत.

एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये प्रदीप कन्नन यांनी म्हटले की, “मी चांगल्या ठिकाणी नोकरी करत होतो. पगारही चांगला होता. पण, काहीतरी चांगले करण्याची माझ्यातील इच्छा मला शांत बसू देत नव्हती. त्यावेळी माझ्या नोकरी सोडून फालूदा विकण्याचा व्यवसाय सुरू करण्याच्या निर्णयाची अनेकांनी खिल्ली उडवली होती. अनेकजण माझ्यावर हसत होते.”

सध्या भारतासह दुबईमध्ये १८ फालूदा आउटलेट्सच्या माध्यमातून यशस्वी व्यवसाय चालवत असलेले प्रदीप कन्नन आता D2C आईस्क्रीम ब्रँड बनवत आहेत.

प्रदीप कन्नन यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये एसी ऑफिसपासून फ्रँचायझी किचनपर्यंत आणि आता जागतिक रिटेल शेल्फपर्यंतच्या त्यांच्या प्रवासाचे तपशीलवार वर्णन केले आहे. “प्रत्येकाला वाटले होते की मी सर्वकाही गमावले आहे. पण, सहा वर्षांनंतर माझ्या फालूदा शॉपचे भारत आणि दुबईमध्ये १८ आउटलेट्स आहेत. ही फक्त सुरुवात आहे”, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

प्रदीप कन्नन यांची यशोगाथा नोकरदारांच्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून व्यवसायांकडे वळण्याच्या वाढत्या ट्रेंडला अधोरेखित करते.

प्रदीप कन्नन यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, त्यांच्याच मार्गावर चालणारे आणखी एक इंजिनिअर मनिंदर सिंग यांनी अमेरिकेतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून पंजाबमधील मोहाली येथे एक फूड स्टॉल सुरू केला आहे. वडिलांच्या निधनानंतर भारतात परतल्यानंतर, मनिंदर सिंग यांनी कॉर्पोरेट जगात पुन्हा न जाण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी, त्यांच्या पत्नीच्या पाककृती कौशल्याने प्रेरित होऊन, त्यांनी राजमा चावल आणि सोया चाप सारख्या पंजाबी पदार्थांचा स्टॉल सुरू केला आहे.