सध्या वैद्यकीय व्यवस्था, पोलीस यंत्रणा यांच्यावर प्रचंड ताण आहे. रुग्णांची काळजी घेणं, सरकारच्या नियमांची अंमलबजावणी करणं अशा जबाबदाऱ्या पार पाडणं त्यांना अनिवार्य आहे. अशातच एका महिला पोलीस उपअधीक्षकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय विशेष आहे त्यात? चला पाहूया.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक महिला पोलीस उपअधीक्षक आपली जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. पण विशेष गोष्ट म्हणजे ही महिला पाच महिन्यांनी गरोदर आहे. हा व्हिडिओ छत्तीसगडमधला आहे. ही पोलीस अधिकारी लोकांना लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करण्याची विनंती करत आहे.

तापलेल्या उन्हात पोलीस उपअधीक्षक शिल्पा साहू या आपल्या हातात काठी आणि चेहऱ्याला फेस शिल्ड लावून रस्त्यावरच्या गर्दीचं नियंत्रण करत आहेत. त्याचबरोबर लोकांना घरातच थांबण्याचं आवाहनही त्या करत आहेत. त्यांच्या या कामाप्रती असलेल्या निष्ठेचं कौतुक सोशल मीडियावरुन होत आहे. शिल्पा यांचे अनेक फोटो, व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत.

आयपीएस दिपांशू काब्रा यांनीही हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना ते म्हणतात, हा फोटो दंतेवाडाच्या पोलीस उपअधीक्षक शिल्पा साहू यांचा आहे. शिल्पा गरोदर असतानासुद्धा प्रखर उन्हात आपल्या सहकाऱ्यांसोबत रस्त्यावर आपलं काम करत आहेत आणि लोकांना लॉकडाऊन पाळण्याबाबत आवाहन करत आहेत.

अनेक जणांनी ट्विट करत त्यांचं कौतुक केलं आहे. तर काही युजर्सनी त्यांना स्वतःची काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे.