काही प्रखर राष्ट्रवादी विचारसरणीचे लोक पाकिस्तानविरोधात द्वेषाचे वातावरण पसरवीत आहेत. त्यामुळे त्यांची ‘ट्विटर अकाऊंटस्’ बंद करण्यात आल्याचे बनावट वाक्य ‘ट्विटर इंडिया’च्या ‘न्यूज पार्टनरशिप’ विभागाचे प्रमुख राहिल खुर्शीद यांच्या तोंडी टाकण्यात आले आहे. या खोटय़ा विधानाचा प्रसार संघ परिवाराशी निगडित असलेल्या ‘स्वराज्य’ या प्रकाशनाने समाजमाध्यमांवर केला आहे. ‘स्वराज्य’चे संपादकीय संचालक आर. जगन्नाथन यांनी ‘ट्विटर’वर याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परंतु हे वाक्य खरे नाही. राहिल खुर्शीद यांना हे वाक्य खरे आहे का, असा प्रश्न विचारणाऱ्या ‘ट्विटर यूजर्स’ना दिलेल्या उत्तरात, त्यांनी सदर ट्वीट हे बनावट असल्याचे म्हटले आहे. मुळात राहिल खुर्शीद यांच्या तोंडी बनावट वाक्य टाकताना समाजमाध्यमांवर द्वेष पसरविणाऱ्यांनी खुर्शीद यांचे पदही तपासलेले नाही. त्यांच्या नावासमोर ‘ट्विटर इंडिया’चे प्रमुख असे लिहिण्यात आले आहे.