तीन हत्तींसह एका पिल्लाचे प्राण वाचवण्यासाठी ट्रेन थांबवणाऱ्या लोको पायलटचं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी कौतुक केलं. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. पीयूष गोलय यांनी लोको पायलटच्या सतर्कतेचं उदाहरण दाखवताना एक छोटी क्लिप आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. यामध्ये एका पिल्लासह तीन हत्ती रेल्वे रूळ ओलांडताना दिसत आहेत.

ही घटना पश्चिम बंगालमधील सिवोक-गुलामा येथील आहे. हत्ती रेल्वे रूळ ओलांडत असताना लोको पायलटनं सतर्कता दाखवत ट्रेन थांबवली. दरम्यान, हत्ती रेल्वे रुळ ओलांडून गेल्यानंतर त्यांनी गाडी पुन्हा पुढच्या दिशेनं नेली. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भात एक क्लिप शेअर करत लोको पायलटचं कौतुकही केलं. “लोको पायलटनं दाखवलेल्या सतर्कतेमुळे एक
पिल्लू आणि तीन मोठ्या हत्तींचे जीव वाचले. हे हत्ती रेल्वे रूळ ओलांडत होते. लोको पायलटनं त्वरित ट्रेन थांबवली आणि त्यानंतर हत्तींनी सुखरूप रेल्वे रूळ ओलांडला,” असं पीयूष गोलय यांनी म्हटलं आहे.