शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. बाळासाहेबांना जाऊन आज आठ वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे काका म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नातं खासं होतं. शिवसेनेतून वेगळं होऊन स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यानंतरही राज यांनी अनेकदा बाळासाहेबांचा उल्लेख ‘माझा विठ्ठल’ असाच केल्याचे पहायला मिळालं. अनेक कार्यक्रमांमध्ये आजही राज बाळासाहेबांच्या आठवणी मोठ्या आपुलकीने सांगताना दिसतात. अशीच एक आठवण राज यांनी याच वर्षी एक मार्च रोजी ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये सांगितली होती. राज यांनी बाळासाहेब आणि शोले चित्रपटाबद्दलच्या आठवणींना या मुलाखतीमध्ये उजाळा देताना एक प्रसंग सांगितला ज्यावेळी बाळासाहेब थेट लुंगीवरच राज यांच्या भेटीसाठी घरी आले होते.

ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंची प्रकट मुलाखत घेण्यात आलेली. एक व्यंगचित्रकार म्हणून राज यांची मुलाखत घेण्यात आली ज्यामध्ये त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली. यामध्ये अगदी आवडता व्यंगचित्रकार, व्यंगचित्र काढताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात, बाळासाहेब, एम. एफ. हुसैन यांच्यापासून ते शाळेतील आठवणी आणि आवडते चित्रपट याबद्दल राज यांनी अनेक किस्से सांगितले. ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलताना राज ठाकरेंनी शोले हा चित्रपट आपण कसा पाहिला आणि त्यामध्ये बाळासाहेबांची काय भूमिका होती याबद्दलचा किस्सा सांगितला.

काय म्हणाले राज?

अमिताभ यांचे अनेक चित्रपट तुम्ही पाहिले असतील याबद्दल राज यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी राज यांनी “शोले चित्रपट १५ ऑगस्ट १९७५ ला लागला, त्यावेळी मी तिसरी चौथीत होतो. तेव्हा मला कांजण्या झाल्या होत्या. तेव्हा माझे वडील मार्मिकला परिक्षण लिहायचे. शब्दनिशाद नावाने. त्यासाठी त्यांना शुक्रवारी चित्रपट पहायला लागायचा. मात्र तो काही कारणाने राहून गेला आणि मी ही तो पाहिला नाही,” असं सांगितलं. मात्र नंतर दोन वर्षांनी एक प्रसंग घडल्याचे राज यांनी पुढे बोलताना सांगितलं. “त्यानंतर दोन वर्षानंतर पाण्याचं उकळतं भांड माझ्या अंगावर पडल्याने मी भाजलो होतो. जवळजवळ सहा ते सात महिने मी घरी होतो. माझ्या अंगावर भांड पडून मला भाजल्याने आईने तो प्रकार झाल्यानंतर रडत बाळासाहेबांना फोन केला. त्यावेळेस बाळासाहेब टॅक्सीने मला भेटायला आले होते. आईने फोन केल्यानंतर बाळासाहेब होते त्या कपड्यांवर म्हणजेच लुंगी आणि बनियान वर मला भेटायला आले,” अशी आठवण राज यांनी सांगितली.

बाळासाहेबांनी दिली खास भेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उकळतं पाणी पडल्याने होणाऱ्या जखमांमुळे मी तेव्हा विव्हळत असायचो, असं राज यांनी सांगितलं. “तेव्हा रेकॉर्डेड एलपी यायच्या. अशीच एक शोले चित्रपटातील डायलॉगची एलपी बाळासाहेबांनी मला दिली होती. त्यानंतर पुढील काही महिन्यांमध्ये मला शोले चित्रपट संपूर्ण पाठ होता,” असं राज यांनी सांगितलं. “शोले चित्रपट १९७५ ला प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास पाच वर्षांनी म्हणजेच १९८० साली आई मला तो चित्रपट पाहण्यासाठी थेअटरमध्ये घेऊन गेली होती. थेअटरमध्ये जसा तो चित्रपट सुरु झाला, तसा मी तो चित्रपट बोलत होतो. संपूर्ण चित्रपट बोललो. न पाहता संपूर्ण डायलॉग पाठ असलेला तो एकमेव चित्रपट होता,” असंही राज या चित्रपटाची आठवण सांगताना म्हणाले.