आपल्या दिव्यांग मुलीला तलवारबाजीच्या स्पर्धेत पाठवण्यासाठी एका पित्याने आपली जमीन गहाण ठेवली. पण कौतुकाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेत मुलीने यश तर मिळवलेच पण बक्षिसाच्या रक्कमेतून तिने आपली गहाण ठेवलेली जमीनही सोडवली आहे.
कॅनडामध्ये काही महिन्यांपूर्वी आंतराष्ट्रीय व्हिलचेअर स्पर्धा पार पडली. यात छत्तीसगढच्या खैरा या छोट्याश्या गावातील रामफूल टोंडर या मुलीने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तिने तलवारबाजीत जगातून ९ स्थान मिळवले आहे. पण तिचे यश मात्र कोणालाही दिसले नाही. दिव्यांग असूनही तिने यावर मात करत यश संपादन केले. या स्पर्धेत पाठवण्यासाठी तिच्या वडिलांनी आपली जमीन गहाण ठेवली होती. एका गरीब शेतक-यासाठी आपल्या जमिनीचा तुकडा आपल्या प्राणापेक्षाही अधिक प्रिय असतो. कारण ही जमिन कसूनच तो आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत असतो. पण रामफुलला या स्पर्धेत पाठवण्यासाठी रतन यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता आपली जमीन गहाण ठेवली आणि यातून आलेल्या पैशातून त्यांनी रामफुलला या स्पर्धेसाठी पाठवले.
विषेश म्हणजे या स्पर्धेत रामफुलने अभूतपूर्व यश मिळवले. या स्पर्धेच्या बक्षिसातून जी रक्कम मिळाली त्या रक्कमेतून तिने आपली गहाण जमीन सोडवून घेतली. रामफूल टोंडर हिच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून तिने इंग्रजीत एमए केले आहे. तिला नुकताच वीर गुंडाधूर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा छत्तीसगढचा राज्य पुरस्कार आहे. त्यानिमित्ताने रामफुलची यशाची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.