एरवी क्वचितच घुबड आपल्या नजरेस पडतं. त्याला दिवसा दिसत नाही, त्यामुळे रात्रीच्यावेळीस या पक्ष्याचं राज्य सुरू असतं. आपल्याकडे या पक्ष्याशी निगडीत असणाऱ्या अंधश्रद्धांमुळे आपल्यासाठी हा पक्षी तसा दुर्लक्षितच. पण या पक्ष्याविषयीचा गैरसमज थोडासा बाजूला ठेवून हा दुर्मिळ व्हिडिओ पाहाच. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये घुबड चक्क दिवसाढवळ्या पाण्यात पोहताना दिसत आहे. घुबड प्रकाशात काहीच करू शकत नाही, तिथे पाण्यात पोहणं हे जवळपास अशक्यच आहे. पण तुमचा विश्वास बसत नसला तरी हा व्हिडिओ खरा आहे.

फिरण्यासाठी गेले असताना दोन मित्रांना हे दृश्य दिसलं, सुरूवातीला त्यांचा डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता, त्यांच्या डोळ्यादेखत घुबडाने पोहून छोटा झरा पार केला. नॅशनल जिओग्राफीच्या माहितीनुसार हे घुबड great horned या नावाने ओळखलं जातं. हे पिल्लू असून घरट्यातून कदाचित खाली पडलं असेल असा अंदाज त्यांनी लावला आहे. घुबड पाण्यात पोहत नाही, पण कदाचित आपला जीव वाचवण्यासाठी कोणताही पर्याय त्याच्याजवळ नसल्याने तो पंखाची फडफड करत असावा असं पक्षीतज्ज्ञाने सांगितलं. संकटात सापडल्यावर आपला बचाव करण्यासाठी पक्षी जे काही करतात तेच त्याने केलं असंही नॅशनल जिओग्राफीने सांगितलं. या व्हिडिओ काही महिन्यांपूर्वीचा आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि सोशल मीडियावर आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.