Niranjan Hiranandani on Ratan Tata: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी त्यांच्या आयुष्यातील चढ-उताराबाबत नुकत्याच एका मुलाखतीत माहिती दिली. शिक्षकी पेशापासून व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर हिरानंदानी यांनी विविध क्षेत्रात नशीब अजमावले. कापड गिरणी चालविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अखेर ते बांधकाम क्षेत्रात स्थिरावले आणि ते अब्जाधीश आहेत.

कर्ली टेल्स या युट्यूब चॅनेलवर काम्या जानी यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये रतन टाटा यांनी त्यांच्या आयुष्याचा प्रवास तसेच दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्याबद्दलची एक आठवण सांगितली आहे. रतन टाटा यांनी एकेदिवशी फोन करून मला एक प्रस्ताव दिला. जो नाकारणे माझ्यासाठी अशक्य होते.

डॉ. निरंजन हिरानंदानी म्हणाले, “१ ऑगस्ट २०२४ रोजी रतन टाटा यांनी मला फोन केला. ते म्हणारे, निरंजन मी टाटा पार्किन्सन ट्रस्ट स्थापन करत आहे. त्यावर माझ्याबरोबर तू ट्रस्टी होऊ शकतोस का?” यावर मी काय बोलणार. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला होता आणि तेव्हापासून त्या ट्रस्टचा मी सहविश्वस्त झालो, असे हिरानंदानी म्हणाले.

हिरानंदानी यांनी आयुष्यात आलेल्या अपयशांचीही माहिती यावेळी दिली. ते म्हणाले, माझ्या आयुष्यात अनेकदा वाईट वेळ आली. जेव्हा एखादी गोष्ट यशस्वी होते, तेव्हा लोक म्हणतात, तुम्ही भाग्यवान आहात. शहर वाढले, तुम्ही योग्य वेळी जागा खरेदी केली. असे घडले किंवा तसे घडले. पण कोणतेही यश योगायोगाने मिळत नाही. पवईतील २५० एकर जागा कुणी विकत घेत नसताना आम्ही ती घेतली. ती जमीन अतिशय ओसाड अशी होती. त्याठिकाणी आम्ही बांधकाम करून प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांनी शंका घेतली होती.

पवईतील जमिनीची किंमत किती?

दरम्यान त्यावेळी पवईतील २५० एकर जमीन किती रुपयांना विकत घेतली? असा प्रश्न हिरानंदानी यांना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, या जमिनीची किंमत मी माझ्या वडिलांनाही सांगितली नाही. मी जर वडिलांना जमिनीची खरी किंमत सांगितली असती तर त्यांना धक्का बसला असता.

हिरानंदानी पुढे म्हणाले, आम्ही आमचा पुढचा प्रकल्पा ठाण्यात केला. त्या जागेवर कोणताही बांधकाम व्यावसायिक प्रकल्प उभारण्यासाठी तयार नव्हता. पण आम्ही हिरानंदानी इस्टेट प्रकल्प यशस्वी करून दाखवला. सांगण्याचा मुद्दा असा की, आम्ही असे प्रकल्प पुन्हा पुन्हा यशस्वी करून दाखवू शकतो.

हिरानंदानी हे हिरानंदानी डेव्हलपर्सचे संस्थापक आहेत. मुंबईतील प्रथितयश विकासकांपैकी ते एक आहेत. कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या कामाबद्दल असलेले प्रेम, सचोटी, शिस्तबद्धता यांचाही उल्लेख केला आहे.