21 Year Old Boy Shares Story About Father Salary: एका २१ वर्षीय रेडिट युजरने त्याला वडिलांच्या जुन्या सॅलरी स्लिप सापडल्यानंतर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याचे वडील आता ५० वर्षांचे आहेत आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे १ कोटी रुपये आहे. तर त्यांना, २०१० मध्ये वार्षिक फक्त ३.२ लाख रुपये पगार होता. तरीही, ती त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदी वर्षे होती, असे युजरने सांगितले आहे.

या युजरने पोस्टमध्ये सांगितले आहे की, त्यावेळी त्यांचे कुटुंब दर आठवड्याला मॉलमध्ये जात असे, चित्रपट पाहत असे, बाहेर जेवत असे आणि ब्रँडेड कपडे खरेदी करत. वडिलांनी त्यांना हे सर्व त्या माफक उत्पन्नात पुरवले होते.

मुलाने सांगितले की, त्याच्या वडिलांनी त्यांच्यावर कधीही आर्थिक ताण येऊ दिला नाही, घरात आनंद आणि समाधान होते. पण २०१७-१८ च्या सुमारास परिस्थिती बदलली. बाहेर जाणे थांबले आणि हळूहळू आनंदाची जागी तणाव वाढू लागला. त्याच्या वडिलांचे उत्पन्न झपाट्याने वाढले असले तरी, कुटुंबातील अंतरही वाढले. वारंवार भांडणे होऊ लागली, संभाषणे आणि भावनिक नात्यांमध्ये अंतर वाढले.

या पोस्टमध्ये हा युजर म्हणाला आहे की, “आता त्याचे वडील वर्षाला जवळजवळ १ कोटी कमावतात, पण घरात कोणीही आनंदी नाही. सतत भांडणे होत असतात. मला माहित आहे की, आधीही भांडणे होत असत, पण आता मला सर्वकाही अधिक स्पष्टपणे जाणवते.”

त्याने पुढे म्हटले की, “मला वाटत नाही की मी कधीही त्यांच्यासारखा होऊ शकेन. जेव्हा आमच्याकडे खूप कमी पैसे होते, तेव्हा त्यांनी आमच्या घरात कोणताही तण-तणाव नव्हता. पण, आता आमच्याकडे खूप काही आहे, तरीही असे वाटते की कुटुंब वेगळे झाले आहे.”

युजरने पोस्टच्या शेवटी असेही नमूद केले आहे की, आता त्याचे पालक क्वचितच बोलतात आणि त्यालाही त्यांच्यापासून दूर गेल्याचे वाटते.

तो म्हणाला, “माझे पालक क्वचितच एकमेकांशी बोलतात. मी सुद्धा त्यांच्याशी क्वचितच बोलतो. मी कदाचित कॉलेज नंतर घरातून बाहेर पडेन. सगळ्याच गोष्टी बिघडल्यासारख्या वाटत आहेत.”

युजरच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी एकाने म्हटले की, “वयानुसार, जबाबदाऱ्या आणि ताणतणावानुसार लोक बदलतात, त्यामुळे तुम्ही जे अनुभवत आहात ते अनेक घरांमध्ये घडते.”

“तुम्हाला असे का वाटते की पैशामुळे अशी परिस्थिती निर्माण होते? ते व्यभिचारासारख्या काही वाईट सवयींमध्ये अडकले आहेत का? जे मध्यमवयीन पुरुषांमध्ये सामान्य आहे”, असे दुसऱ्या एकाने म्हटले.