‘नोबेल पुरस्कार प्रदान सोहळ्याला जमलेल्या लोकांकडे पाहिल्यावर मला वाटलं की, जणू हा गोऱ्या लोकांचा महासागर आहे. मी एकमेव भारतीय या सभागृहात आहे. नोबेल पुरस्कारप्राप्त व्यक्तीच्या समोर त्यांच्या देशाचा ध्वज आहे, पण माझ्यासमोर माझ्या देशाचा ध्वज नसून ब्रिटिशांचा ‘युनियन जॅक’ आहे. माझ्या देशाचा ध्वज माझ्यासमोर नाही, ही गोष्ट मनाला सर्वाधिक चटका लावून जाणारी आहे’ ही खंत होती पदार्थविज्ञान शास्त्रामधील नोबेल पुरस्कर विजेते चंद्रशेखर व्यंकट रामन म्हणजेच सर.सी.व्ही रामन यांची.

भारतीय वेश परिधान करून रामन पुरस्कार सोहळ्याला गेले. अर्थात डोक्याला पगडी बांधलेल्या आणि ब्रिटीशांच्या गुलामगीरीत वाढलेल्या भारतीय शास्त्रज्ञाकडे लोक संमिश्र भावनेनं पाहतं होते. तमाम भारतीयांसाठी ती आनंदाची बाब होती, पण आपण अजूनही ब्रिटिशांचे गुलाम आहोत याचं बोचरं दु:ख त्यांना कायम सतावत राहिलं. आज सर.सी.व्ही रामन यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्तानं १९३० सालच्या नोबेल पुरस्कार सोहळ्यातील आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.

maldives president mohamed muizzu marathi news
विश्लेषण: मालदीवमध्ये चीनधार्जिण्या अध्यक्षांचा ‘दुसरा’ विजय… भारतासाठी हा निकाल किती महत्त्वाचा?
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
arvind kjriwal jail tihar
अरविंद केजरीवाल करणार वर्क फ्रॉम जेल? काय आहेत कायदेशीर तरतुदी?

नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले आशियायी शास्त्रज्ञ होते ‘रामन इफेक्ट’ या नावानं त्यांनी केलंलं संशोधन जगभरातील शास्त्रज्ञांसाठी मैलाचा दगड मानला जातो. कोणत्याही आधुनिक साम्रगीशीवाय त्यांनी आपलं संशोधन पूर्ण केलं होतं. एखाद्या द्रव पदार्थावर पडणारे प्रकाशकिरण आणि त्या द्रव पदार्थामधून बाहेर पडणारे प्रकाशकिरण यांच्यामध्ये योग्य ते प्रकाश शोषक पदार्थ वापरल्यास त्यामुळे वर्णपटामध्ये नवीन रंगरेषा तयार होतात. एकच तरंगलांबी असलेले प्रकाशकिरण काही पदार्थावर पडल्यास पदार्थातील रेणूंमुळे प्रकाशकिरणांचे विकिरण होते आणि मूळ प्रकाशाच्या तरंगलांबीइतक्या किरणांबरोबरच वेगळी तरंगलांबी असलेले प्रकाशकिरण दिसतात हे त्यांनी सिद्ध केलं. यालाच ‘रामन इफेक्ट’ असं नाव त्यांनी दिलं. रामन यांच्या संशोधनानंतर केवळ १० वर्षांमध्ये दोन हजारांहून जास्त रासायनिक संयुगांची रचना ‘रामन इफेक्ट’च्या सहाय्याने निश्चित केली गेली. म्हणूनच त्यांचा हा शोध सर्वात महत्त्वाचा मानला जातो.

या व्यतिरिक्त आणखी एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर रामन यांनी शोधलं होतं. युरोपातून समुद्रमार्गे भारतात येत असताना ‘आकाश निळे का असते?’ हा प्रश्न त्यांना पडला होता. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे मेहनत केली आणि अखेर त्यांना याचं उत्तर सापडलं. जेव्हा प्रकाशकिरण अत्यंत लहान आकाराच्या कणावर पडल्यावर सर्व दिशांना पसरतो. याला प्रकाशाचं विकिरण म्हणतात. विकिरणामुळेच आकाश निळे दिसते हे त्यांच्या लक्षात आलं. सूर्यापासून निघालेला प्रकाश जेव्हा पृथ्वीवर पोहोचतो तेव्हा वातावरणात असलेल्या वायूंचे रेणू आणि इतर सूक्ष्म कण त्याच्या वाटेत येतात. यावेळी कमी तरंगलांबी असलेल्य निळ्या रंगाचे जास्तीतजास्त प्रमाणात विकिरण होते. हा रंग जास्त प्रमाणात आकाशात पसरतो म्हणून अनेकदा आकाश निळे भासते असा महत्त्वपूर्ण शोध त्यांनी लावला.

रामन यांनी प्रकाशाच्या विकिरणासंदर्भात जसं संशोधन केलं तसं भारतीय वाद्यांवरही केलं होतं. १९२९ मध्ये त्यांना ‘सर’ हा किताब देण्यात आला, १९३० मध्ये रॉयल सोसायटीतर्फे दिले जाणारे ‘हायग्रेझ पदक’, १९५१ साली फिलाडेल्फिया विद्यापीठाचे ‘फ्रँकँलिन पदक’, १९५४ साली ‘भारतरत्न’ हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आणि १९५७ मध्ये ‘लेनिन’ पारितोषिक अशा विविध पुरस्कारांनी रामन यांना भूषविण्यात आले होते.

(वरील माहिती ही ‘शोध आणि बोध’ या सदरात प्रकाशित झालेल्या हेमंत लागवणकर यांच्या लेखातून घेतली आहे.)