Reddit Post Of Engineer Who Left US Job And Returned India: गेल्या काही दिवसांपासून परदेशात स्थायिक झालेले अनेक भारतीय लोक मायदेशी परतत आहेत. यामध्ये असेही काही लोक आहेत, ज्यांना भारतात परतण्याचा पश्चाताप होत आहे. दरम्यान, भारतात परतण्याचा निर्णय चुकल्याबाबतची एका व्यक्तीची रेडिट पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्याने भारतात परतल्यानंतर आणि भारतात परतण्यापूर्वी त्याचे आयुष्य कसे होते, याबाबतचे अनुभव शेअर केले आहेत.
पोस्टनुसार, या व्यक्तीने अमेरिकेतून मास्टर्स केले असून, नंतर H1B व्हिसाची वैधता संपेपर्यंत ४ वर्षे अमेरिकेत काम केले. २०२२ मध्ये त्याच्या अमेरिकन कंपनीतून राजीनामा देऊन हा व्यक्ती अखेर भारतात परतला. पण, भारतात परतून ३.५ वर्षाे झाल्यानंतरही, या व्यक्तीला अजूनही त्याच्या भारतात परतण्याबद्दलच्या निर्णयाचा पश्चात्ताप होत आहे.
आठ पट जास्त पगार
पोस्टनुसार, हा व्यक्ती अमेरिकेत ज्या पदावर होता त्याच पदावर तो भारतात मिळणाऱ्या पगारापेक्षा ‘आठ पट जास्त’ पगार मिळवत होता. त्याचा भारतातील पगार तुलनेने खूपच कमी आहे. यामुळे त्याच्या बचतीवरही परिणाम झाला आहे. या पोस्टमध्ये या व्यक्तीने अमेरिकेतील उत्तम वर्क-लाईफ बॅलन्स, स्वच्छ हवा आणि पायाभूत सुविधा यासारख्या घटकांवरही भाष्य केले आहे.
माझी सर्वात मोठी चूक होती
“अमेरिकेतून भारतात परतणे ही माझी सर्वात मोठी चूक होती”, असे या रेडिट पोस्टचे शिर्षक आहे.
पोस्टच्या सुरुवातीला म्हटले आहे की, “मी अमेरिकेतून माझे मास्टर्स केले आणि तिथेच ४ वर्षे नोकरी केली. तोपर्यंत माझा H1B व्हिसा संपला आणि मला राजीनामा द्यावा लागला. तसेच यामुळे मला २०२२ मध्ये परत भारतात यावे लागले. तिथून खूप वाईट परिस्थिती आली आहे. मी सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो आणि मी अमेरिकेत इथल्यापेक्षा ८ पट जास्त कमाई करत होतो. तिथली माझी मासिक बचत इथल्या माझ्या वार्षिक बचतीपेक्षा जास्त होती.”
यातून कसे बाहेर पडायचे
“इथल्या तुलनेत तिथे वर्क-लाईफ बॅलन्स उत्तम होता, स्वच्छ हवा आणि चांगल्या पायाभूत सुविधा यासारख्या इतर घटकांकडेही दुर्लक्ष करता येत नाही. मी येथे पैसे मिळवण्यासाठी खूप झटत आहे. माझी मास्टर्स डिग्री आणि अमेरिकेतील नोकरीच्या जोरावरही मला चांगले पॅकेज मिळविण्यास मदत होत नाही. कारण येथील कंपन्यांना त्याची अजिबात पर्वा नाही. आता यातून कसे बाहेर पडायचे हे मला माहित नाही”, असे त्याने पोस्टमध्ये शेवटी लिहिले आहे.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
या व्यक्तीने ही पोस्ट शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच प्रचंड व्हायरल झाली असून, सोशल मीडिया युजर्सीन त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “जर तुमचा व्हिसा संपला असेल, तर ही तुमची ‘चूक’ कशी? पर्यायच नव्हता ना?”, असे एका युजरने म्हटले.
“तुम्ही म्हणालात की यूएस मास्टर्स किंवा अमेरिकन कंपनीतील नोकरीचा अनुभव याने काही फरक पडत नाही, तर भारतातील कंपन्यांना काय हवे आहे?” असे आणखी एक युजर म्हणाला.