Robbery caught on camera: चालत्या रिक्षामध्ये एका महिलेला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. एका महिलेने तिच्या धाडसामुळे या संकटाला तोंड देत त्यातून ती थोडक्यात बचावली.

संबंधित घटना पंजाबमधील जालंधर बायपासजवळ घडली. तिचे नाव मीना कुमार असे आहे. पीटीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, तिने फिल्लौरहून नवाशहरला जाणारी बस पकडण्यासाठी जालंधर बायपासवरून रिक्षा पकडली. ड्रायव्हरव्यतिरिक्त रिक्षात दोन प्रवासी आधीच बसलेले होते. थोड्याच वेळात ते तिघेही लूटमार करणारे भामटे असल्याचे या महिलेच्या लक्षात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही रिक्षा बसस्टॉपवर पोहोचण्याआधी मागच्या सीटवर बसलेल्या दोघांपैकी एकाने रिक्षाचा वेग कमी करण्यास सांगितले. त्यानंतर दोघा हल्लेखोरांनी महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्लेखोरांनी तिचे हात स्कार्फने बांधले आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवला. महिलेने यादरम्यान प्रसंगावधान दाखवत आरडाओरडा सुरू केला आणि रस्त्याने जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ती रिक्षाच्या बाहेर झुकली. या व्हिडीओमध्ये हा सर्व प्रकार दिसत आहे.

महिला बाहेर झुकलेली दिसल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्यांनी तिची मदत करण्याचा प्रयत्न केला आणि अखेर त्या लुटारूंच्या तावडीतून तिला सोडवले. जवळपास अर्धा किलोमीटर हा प्रकार सुरू होता. या हल्लेखोरांपैकी एकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांना अटक केली.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. महिलेने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं कौतुक होत आहे. तसंच सोशल मिडिया युजर्स यावरून पंजाब सरकारवर टीका करत आहेत. पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचे युजर्सने म्हटले आहे. या महिलेची मदत करणाऱ्यांचंही कौतुक होत आहे.