Harsh Goenka Shared Video on Donald Trump: भारत-पाकिस्तान यांच्यात १० मे रोजी तीन दिवसांच्या लष्करी तणावानंतर शस्त्रविराम झाला. भारताने शस्त्रविरामाची घोषणा करण्यापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत शस्त्रविराम झाल्याचे जाहीर केले होते. यामुळे जगभरात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. भारत-पाकिस्तान यांच्या शस्त्रविराम घडवून आणण्यासाठी ट्रम्प यांनी कसे प्रयत्न केले, यावर प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी मजेशीर भाष्य केले आहे. सोशल मीडियावरील एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी ट्रम्प यांच्या दाव्याला टोला लगावला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम होण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली नसल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हा भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रातला विषय होता, असेही भारताने म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी तरीही आपणच मध्यस्थी केल्याचा दावा रेटून नेला. तसेच आपण दोन्ही देशांना युद्धाऐवजी व्यापार करू, असे सांगितले असल्याचे ट्रम्प म्हणाले होते.
हर्ष गोयंका यांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ
उद्योगपती हर्ष गोयंका यांनी एक्सवर एक व्हिडीओ शेअर करत ट्रम्प यांच्या दाव्यातील फोलपणा दाखवून दिला. या व्हिडीओमध्ये एक उत्साही तरूण मेट्रो स्थानकात उभा असलेला दिसतो. स्थानकात मेट्रो येताच तो धावत जाऊन मेट्रो अडविण्याचा प्रयत्न करतो. अर्थात मेट्रो आपोआपच स्थानकात उभी राहणारच होती. त्यानंतर सदर तरूण व्यायाम वैगरे करून इतर चाळे करतो. तसेच मेट्रो पुढच्या स्थानकात जाण्यासाठी सुरू होताच, तो मेट्रोल ढकलण्याची कृती करतो.
अर्थातच सदर व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठी तयार करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून हर्ष गोयंका यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. कॅप्शनमध्ये हर्ष गोयंका लिहितात, “कुणीतरी मला विचारले की, ट्रम्प यांचा भारत-पाकिस्तान शस्त्रविरामात काय भूमिका होती.”
हर्ष गोयंका यांच्या या पोस्टला इतर पोस्टप्रमाणेच अल्पावधीत चांगली प्रसिद्धी मिळाली आहे. अनेकांना त्यांचा हा हजरजबाबीपणा आवडेला दिसत आहे.
मुंबईच्या पावसाबद्दलही केले होती पोस्ट
दरम्यान सोमवारी (२६ मे) मुंबईत झालेल्या मुसळधार पावसावरही हर्ष गोयंका यांनी मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला होता. रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली, ट्रेन रद्द झाल्या होत्या.
हर्ष गोयंका यांनी खड्ड्यांतून मार्ग काढणाऱ्या एका जीपचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात ते म्हणाले, “मला आशा आहे की, आज कामावर जाण्यासाठी तुमच्या गाडीला असे टायर असावेत. कारण मुंबई स्पिरीट आपल्याला कायम ठेवायचे आहे.” या व्हिडीओतून हर्ष गोयंका यांना मुंबईतील कर्मचाऱ्यांचा कार्यालयात पोहोचण्याचा संघर्ष दाखवायचा होता.