दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर सचिन तेंडुलकरचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये सचिन ज्या मुंबईच्या रस्त्यांवर क्रिकेटची बाराखडी शिकला त्याच रस्त्यावर पुन्हा एकदा क्रिकेट खेळताना दिसतोय.

मात्र, नेमकं असं काय झालं की सचिन त्यावेळी क्रिकेट खेळायला रस्त्यावर उतरला? याबाबत मुंबई मिररने त्यावेळी सचिनसोबत जे त्याचे मित्र होते त्यांच्याशी संपर्क साधून खरं कारण जाणून घेतलं आहे. या वृत्तानुसार, सचिन आणि त्याचे मित्र रविवारी रात्री डिनरसाठी जात होते. कारमध्ये सचिनचे लहानपणीचे दोन मित्र, अतुल रानडे आणि डॉ. संजय हे होते. रानडे मुंबई आणि गोव्यासाठी क्रिकेट खेळले आहेत, तर संजय हे गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेत राहतात. पण सध्या डॉ. संजय हे भारतात असून मुंबईत सचिनला भेटण्यासाठी ते गेले होते. आपल्या जुन्या मित्रांना भेटल्यामुळे सचिन उत्साहित होता.

त्यांची गाडी वांद्रे येथून जात असताना मेट्रोचं बांधकाम सुरू असलेल्या रस्त्यावर काही तरुण क्रिकेट खेळत होते. त्या तरुणांना पाहून डॉ. संजय यांनी सचिनला लहानपणीच्या दिवसांची आठवण करुन दिली आणि ‘चल आपले लहानपणीचे दिवस पुन्हा जगुया ? असं म्हटलं. त्यावर सचिनला काहीच आक्षेप नव्हता, तो आनंदात तयार झाला. सचिन तेथेही खेळण्याचा आनंद घेत होता पण व्हायचं ते झालं आणि अखेर काही गाड्या त्याला पाहून थांबल्या. थोड्याच वेळात सचिन तेथे खेळत असल्याचं वृत्त परिसरात पसरायला सुरूवात झाली आणि गर्दी जमली, अशी माहिती रानडे यांनी दिली. नंतर त्या तरुणांसोबत सेल्फीकाढून सचिन व त्याचे मित्र तेथून निघाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हिडीओ –

[jwplayer RafQbnul]