Saudi Arabia Amusement Park Ride Viral Video : एका पार्कमध्ये राईड हवेत असतानाच राईडचे अचानक दोन तुकडे झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेत सुदैवाने कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, यामध्ये अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हायरल होणारा व्हिडीओ सौदी अरेबियामधील एका पार्कमधील असल्याचं सांगितलं जात आहे.

नेमकं काय घडलं?

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा सौदी अरेबियामधील आहे. ही घटना ३१ जुलै रोजी सौदी अरेबियातील ग्रीन माउंटन पार्क या ठिकाणी घडली आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्यात किमान २३ लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त सौदी अरेबियातील माध्यमांच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.

३६० डिग्री राईडचा आनंद घेत असताना राईडमध्ये अनेक लोक बसलेले होते. यावेळी राईड मागे-पुढे फिरत असताना अचानक राईडचा एक खांब अर्ध्यातून तुटतो आणि क्षणात सर्व लोकांसह राईड खाली आदळते. त्यानंतर त्या ठिकाणी एकच गोंधळ होतो. ही राईड तुटल्यानंतर त्या ठिकाणी लोकांचा मोठा आरडा-ओरडा ऐकू येत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. राईडमधून यावेळी काही लोकही खाली कोसळताना दिसत आहेत.

दरम्यान, घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की राईडचा खांब इतक्या जोरात तुटला की राईडमुळे अनेकांना दुखापत झाली. ही घटना घडल्यानंतर वैद्यकीय पथकांनी घटनास्थळी जाऊन तातडीने जखमींवर उपचार केले आणि त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. या घटनेची स्थानिक प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली आहे. तसेच तेथील राईड बंद करण्यात आली असून पार्कमध्ये सुरक्षा तपासणी सुरू करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.