आकाशामध्ये किती तारे आहेत असा प्रश्न तुम्हालाही नक्कीच कधीतरी पडला असणार. असेच प्रश्न अनेकदा अनेक गोष्टींबद्दल पडतात. पण शास्त्रज्ञांनी अशाच एका अजब प्रश्नाचं उत्तर शोधून काढलं आहे. तर हा प्रश्न आहे, पृथ्वीवर किती मुंग्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर सोमवारी प्रकाशित करण्यात आलेल्या ‘प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या अहवालात देण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे मुंग्यांची संख्या ही पूर्वी अंदाज वर्तवण्यात आलेल्या संख्येपेक्षा २० पटीने अधिक आहे. याबद्दलचं वृत्त सीएनएनने दिलं आहे.
“आम्ही आधीच्या आकडेवारीबद्दल काही बोलणार नाही. मात्र ती आकडेवारी ही केवळ अंदाज होता. त्यांच्याकडे काही ठोस माहिती उपलब्ध नव्हती. मात्र आमच्या अभ्यासाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही अनेक गोष्टींचा अभ्यास करुन पुराव्यांसहीत माहिती गोळा करुन हा अहवाल सादर केल आहे,” असं या अहवालाच्या लेखकांपैकी एक असणाऱ्या सॅबीन एस. नोटेन यांनी सीएननशी बोलताना सांगितलं.
पुर्वीच्या अंदाजाप्रमाणे जगभरातील मुंग्यांची संख्या ही एक क्वाड्रेलियन आणि १० क्वाड्रेलियनच्या दरम्यान असल्याचं जैवशास्त्रज्ञ बर्ट होल्डोब्लेर आणि एडवर्ड ओ. विल्सन यांनी म्हटलं होतं. जगभरातील एकूण किटकांच्या संख्येपैकी मुंग्यांची संख्या ही एक टक्का असल्याचं गृहित धरुन ही आकडेवारी काढण्यात आली होती. नव्या संशोधनामध्ये जगभरातील माहितीचा अभ्यास करुन, मुंग्यांसंदर्भातील ४६५ वेगवेगळ्या अभ्यास अहवालांचे आणि उपलब्ध कागदपत्रांचं वाचन करुन एक हजार ३०६ ठिकाणांवरुन नमुने गोळा करण्यात आले.
सरासरी ८० वर्षांचा कालावधी मुंग्यांच्या संख्येसंदर्भातील अभ्यासाठी पाहण्यात आला. हा कालावधी मोठा वापरत असला तरी तो व्यापक आणि अचूक आकडेवारीसाठी निवडण्यात आल्याचं संशोधक सांगतात. आता एवढा दिर्घ कालावधी का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर अभ्यासासाठी आवश्यक असणाऱ्या माहितीचा आवाका पाहता संशोकांना सर्व माहिती गोळा करता येत नाही. उदाहर्णार्थ जमिनीखाली लाणाऱ्या मुंग्यांचा यामध्ये समावेश नाही कारण त्यांच्याबद्दलची कोणतीच आकडेवारी उपलब्ध नाही.
आता हा सगळा अभ्यास करुन आणि संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी सादर केलेल्या अहवालानुसार जगामध्ये २० क्वाड्रेलियन मुंग्या आहेत. म्हणजेच आकडेवारीमध्ये सांगायचं झाल्यास पृथ्वीवरील मुंग्यांची संख्या २०,०००,०००,०००,०००,००० इतकी आहे.