नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने कुख्यात सीरियल किलर चार्ल्स शोभराजला सोडण्याचे आदेश दिले आहेत. २००३ मध्ये याच कोर्टाने शोभराजला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने शोभराजला सोडण्याचा निर्णय घेतला आहे कारण त्याचं आता वय झालं आहे. एके काळी बिकीनी किलर म्हणून कुख्यात असलेला शोभराज ७८ वर्षांचा झाला आहे. १५ दिवसांच्या आत त्याला त्याच्या देशात सोडलं जावं असेही आदेश कोर्टाने दिले आहेत.
चार्ल्स शोभराजची आई व्हिएतनामची
चार्ल्स शोभराजची आई व्हिएतनामची होती तर त्याचे वडील भारतीय होते. ६ एप्रिल १९४४ ला जन्मलेला शोभराज आता ७८ वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म व्हिएतनाममध्ये झाला तेव्हा त्या देशावर फ्रान्सने कब्जा केला होता. त्यामुळेच चार्ल्स शोभराजकडे फ्रान्सचं नागरिकत्व आहे. चार्ल्स शोभराजला द सर्पेंट आणि बिकीनी किलर या नावाने ओळखलं जातं.
चार्ल्स शोभराजला बिकिनी किलर का म्हटलं जातं?
चार्ल्स शोभराज या सीरियल किलरला बिकिनी किलर असंही म्हटलं जातं त्यामागेही एक कारण आहे. १९७० च्या दशकात चार्ल्स शोभराजने अनेक हत्या केल्या. त्यात जेव्हा महिलांचे मृतदेह मिळाले त्या मृतदेहावर फक्त बिकिनी होती. त्यामुळेच चार्ल्स शोभराजला बिकिनी किलर असंही संबोधलं जातं. पोलिसांना चकमा देण्यातही तो पटाईत होता. मात्र आता त्याचं वय झाल्याने त्याला सोडण्यात आलं आहे.
वेश बदलण्यात चार्ल्स शोभराज पटाईत
वेश बदलण्यात चार्ल्स शोभराज एकदम पटाईत होता. त्याने अनेक महिला पर्यटकांना लक्ष्य केलं होतं. १९७६ ला त्याला दिल्लीत अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं. १९८६ ला शोभराज जेलमधून पळाला होता. तिहार तुरुंगात त्याने त्याच्या वाढदिवसाची पार्टी ठेवली होती. त्यावेळी त्याने जी मिठाई आणि केक वाटले होते त्यात गुंगी येणारं औषध मिसळलं होतं. तुरुंगातल्या सगळ्या गार्ड्सना त्याने ही मिठाई खाऊ घातली. या सगळ्यांची शुद्ध हरपल्यानंतर शोभराज जेलमधून पळून गेला होता.
चार्ल्स शोभराजचं सगळं आयुष्यच मोठं रंजक ठरलं आहे. त्याच्या सुटकेच्या आदेशानंतर गुन्हेगारी विश्वातला काळा अध्याय पुन्हा एकदा समोर आला आहे. सोशल मीडियावर चार्ल्स शोभराजची चर्चा या बातमीने पुन्हा एकदा रंगली आहे. चार्ल्सच्या आयुष्यावर The Sprpent नावाची वेब सीरिजही तयार करण्यात आली आहे.
चार्ल्स शोभराज हा विविध देशात अनेक गुन्हे करून फरार असलेला इंटरनेशनल क्रिमिनल होता. भारत पाहण्यासाठी आलेले परदेशी पर्यटक हे त्याचे मुख्य टार्गेट असायचे. स्वतःच्या रूपाची आणि बोलण्याची छाप परदेशी तरुणींवर पाडून त्यांना आपल्या जाळ्यात ओढून चार्ल्स आपली भूक भागवत असे. आणि नंतर त्यांचा खून करीत असे. पैश्यासाठी वाट्टेल त्या थराला जाणारा हा गुन्हेगार बेकायदा मार्गाने शस्त्र आणून तो गुन्हे करण्यात वाकबगार होता.