King Cobra Viral Video : कल्पना करा की, तुम्ही अंथरुणात गाढ झोपला आहात आणि अचानक तुमच्या शरीरावर काहीतरी रेंगाळत असल्याचे जाणवले. मग तुम्ही ताडकन जागे झाल्यावर तुमच्यासमोर एक भयानक दृश्य दिसले की, एक महाकाय किंग कोब्रा हळूहळू तुमच्या अंथरुणावर चढतोय, तर… साहजिकच कोणाबरोबरही असे घडले, तर त्याची पहिल्यांदा झोप उडेल आणि तो घाबरून किंचाळत दूर पळेल. पण, त्यादरम्यान किंग कोब्रा हल्लाही करू शकतो. उत्तराखंडमधील एका तरुणाबरोबर असेच काहीसे घडले आहे. पण, आश्चर्याची बाब म्हणजे तरुण घाबरण्याऐवजी चक्क उठून किंग कोब्राचा व्हिडीओ काढू लागला. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
झोपेत किंग कोब्रासारखा जीवघेणा साप अंगावर चढला, तर साहजिकच कोणाच्याही काळजाचे ठोके वाढतील; पण व्हिडीओतील तरुण मात्र कोणत्याही भीतीशिवाय किंग कोब्रा बसलेल्या अंथरुणातून हळूच दूर होतो आणि बिनधास्तपणे व्हिडीओ ऑन करून किंग कोब्राची हालचाल कॅमेऱ्यात कैद करतो.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अंथरुणावर एक तरुण झोपला होता. यावेळी अचानक एक किंग कोब्रा त्याच्या अंथरुणात शिरतो. यावेळी तरुण न घाबरता शांतपणे कोणतीही हालचाल न करता, किंग कोब्राचे रेकॉर्डिंग करू लागतो. तो कधी त्याच्या हात-पायांवर, तर कधी पलंगावर फिरतोय. पण, किंग कोब्रा जेव्हा त्याच्या डोक्याजवळ येतो आणि त्याच्या नजरेला नजर देऊन पाहू लागतो तेव्हा तरुण खूप घाबरतो. यावेळी तरुण भीतीने लगेच पलंगावरून उडी मारतो. सुदैवाने तो नाग शांत होता; अन्यथा काहीही घडले असते.
किंग कोब्राचा हा भयानक व्हिडीओ @insidehistory नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. एका युजरने लिहिले की, निसर्ग दुसरी संधी देत नाही. तर दुसऱ्याने लिहिले की, हे धाडस नाही; तर मूर्खपणा आहे. तिसऱ्याने लिहिले की, साप माणसापेक्षा जास्त शांत आहे. शेवटी एकाने लिहिले की, हे एका दुःस्वप्नासारखे आहे.