Cobra found in factory: छत्तीसगडमधील बिलासपूर इथली प्रसिद्ध स्नेक गर्ल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एका कारखान्यात असलेल्या कोब्राला ती सुरक्षितपणे बाहेर काढताना दिसत आहे. या व्हिडीओने लोकांना आश्चर्यचकित केलं आहे आणि प्रत्येक जण तिच्या धाडसाचं कौतुक करत आहेत.

कारखान्यात सापडला कोब्रा

अजिता पांडे ही स्नेक गर्ल म्हणून ओळखली जाते. बिलासपूरमधील एका कारखान्यात साप दिसल्याची माहिती तिला मिळाली. घटनास्थळी पोहोचली तेव्हा तिला पोत्यांच्या ढिगाऱ्यामागे लपलेला एक विषारी कोब्रा दिसला. या व्हिडीओमध्ये ती स्वत:ला किंवा कोब्राला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडताना दिसत आहे.

हिवाळ्यात सापांपासून सावधान

हिवाळ्यात सापांचा धोका अधिक असतो आणि याबाबत जागरूकता रहावी यासाठी अजिता हिने हा व्हिडीओ पोस्ट केल्याचे म्हटले जाते. तिने सांगितले की, थंडी वाढत असताना साप आणि इतर सरपटणारे प्राणी उबदार जागांच्या शोधात गोदामे आणि साठवणुकीच्या क्षेत्रात प्रवेश करतात. जर ते गोदामात किंवा बंद जागेत असतील तर त्यांना हात लावण्यापूर्वी नीट पहा आणि हलकेसे हाताने चाचपून पहा, जेणेकरून तिथे नेमकं काय आहे हे कळेल.

अजिताने हा व्हिडीओ तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. फॅक्टरीमध्ये कोब्रा सापडला, या हिवाळ्यात सापांपासून सुरक्षित राहा अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

प्रशिक्षण नसताना साप पकडण्याचा प्रयत्न करू नका

व्हिडीओच्या शेवटी अजिता हिने सर्वांना आवाहन केलं की, जर घरात किंवा जवळपास साप दिसला तर त्याला स्पर्श करण्याचा किंवा हाकलून लावण्याचा प्रयत्न करू नये. ताबडतोब प्रशिक्षित सर्पमित्राला कॉल करा. अजिताने हजारो सापांना सुरक्षितपणे वाचवले आहे आणि ती वन्यजीवन संवर्धन आणि सुरक्षिततेबद्दल जागरूकता पसरवत आहे.