‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ फक्त माणसाच्या नावावर आहे असे नाही तर आतापर्यंत जगातील कित्येक प्राण्यांच्या नावे गिनीज विश्वविक्रम आहेत. कोण्या एका मांजरीने उंच उडी मारली, कोणाची शिंगे मोठी आहे तर कोणाची उंची असे विविध प्रकारचे विक्रम प्राणीच काय पण पक्ष्यांच्या देखील नावावर आहेत. आता ‘समुद्रातील गाय’ अशी ओळख असणारा लोकप्रिय स्नूटी देखील आपल्या नावे एक नवा विक्रम नोंदविण्यास सज्ज झाला आहे. स्नूटीने दुर्मिळ प्रजातीमध्ये सर्वाधिक वयाची सीमा ओलांडल्याने दुसऱ्यांदा ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने दखल घेतली आहे. १९४८ मध्ये आयर्लंडमध्ये जन्मलेल्या स्नूटीला ११ व्या महिन्यात फ्लोरिडाच्या प्राणी संग्रहालयात आणले होते.
लोकांना आकर्षित करणारा स्नूटी या आठवड्यात वयाची ६८ वर्षे पुर्ण करत आहे. स्नूटीला कॅमेराची चांगलीच भूरळ आहे. प्राणीसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटक ज्यावेळी त्याचा फोटो घेण्याचा प्रयत्न करतात तेंव्हा तो टॅकमधून कॅमेराच्या दिशेने आकर्षित होतो. त्याला पाहण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जून फ्लोरिडाच्या संग्रहालयाला भेट देत असतात.
समुद्रातील दुर्मिळ प्रजातीपैकी एक असा सस्तन प्राणी असणारा स्नूटी सर्वात अधिक वय असणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. याव्यतिरीक्त समुद्रातील प्रजातीवर आभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांसाठी स्नूटीने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. समुद्रात आढळणाऱ्या सस्तन प्राण्यांचा आभ्यास करण्यासाठी आतापर्यंत शंभराहून अधिक प्रयोग स्नूटीवर करण्यात आले आहेत.