सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सरनी त्यांचं एक अनोखं स्थान निर्माण केलं आहे. रोजच्या जीवनात घडणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवर कन्टेन्ट लिहून व्हिडीओ बनवण्यात हे इन्फ्लुएन्सर पारंगत असतात. आज सोशल मीडियावर एक इन्फ्लुएसर तिचा जोडीदार शोधत आहे. तसेच यासाठी तिनं वर्तमानपत्रात खास जाहिरात देऊन काही अनोख्या अटीसुद्धा ठेवल्या आहेत; जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
सोशल मीडियाच्या या इन्फ्लुएन्सरचं नाव रिया असं आहे. रिया एक जोडीदार शोधत आहे. या तरुणात रील बनवण्याचेही गुण असावेत, अशी तिची इच्छा आहे. तर त्यासाठी तिनं वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे. ट्विटरवर एका युजरनं ही पोस्ट शेअर केली आहे. वर्तमानपत्रात दिलेल्या या जाहिरातीला ‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जोडीदाराच्या शोधात आहे’ असं हेडिंग देण्यात आलं आहे. तसेच हेडिंगच्या खाली तिनं लग्नासाठी वरासमोर काही अटी ठेवल्या आहेत आणि जाहिरातीच्या सगळ्यात शेवटी तिनं ई-मेल आयडी लिहून दिला आहे. इन्फ्लुएसरनं वर्तमानपत्रात दिलेली ही मजेशीर जाहिरात एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
हेही वाचा…“कृष्णा नदीच्या काठी कृष्ण वाजवतो बासरी..” वहिनीने घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल
पोस्ट नक्की बघा :
लग्नासाठी ठेवल्या मजेशीर अटी :
इन्फ्लुएन्सर तरुणीनं या जाहिरातीत दिलेल्या अटी पुढीलप्रमाणे : जोडीदार कॅमेऱ्यात बोलताना लाजणारा नको; तर तरुणीसोबत रिलेशनशिप या विषयावर रील बनवणारा हवा. ट्रेंडिंग विषयावर कन्टेन्ट बनवणाराही हवा; पण एकत्र कुटुंबात राहणारा मुलगा नको. तसेच तरुणीला भेटायला येण्याआधी ॲमेझॉन मिनी टीव्हीवर ‘हाफ लव्ह हाफ अरेंज’ (हाफ लव्ह हाफ अरेंज ही एक सीरीज आहे) येताना बघून येणे; जेणेकरून तरुणीला कोणती मुलं आवडत नाहीत यांचा अंदाज तरुणाला येईल. प्रीमियर प्रो (Premiere Pro) या एडिटिंग ॲपबद्दल तरुणाला माहिती असावी. कारण- तो तरुणीचे रील, व्हिडीओ किंवा ब्लॉग एडिट करू शकेल अशा मजेशीर अटी या तरुणीने लग्नासाठी ठेवल्या आहेत.
सोशल मीडियावर ही पोस्ट @Aaayushiiiiiii या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच या पोस्टला ‘आतापर्यंतची सगळ्यात विचित्र लग्नाची जाहिरात’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. अनेक जण ही जाहिरात पाहून मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. तर काही जण त्या इन्फ्लुएन्सर तरुणीसाठी वर म्हणून तरुणांचे मजेशीर फोटो कमेंटमध्ये पाठवताना दिसत आहेत. तसेच एका युजरनं, मला क्रिकेट या खेळाचे व्हिडीओ एडिट करता येतात. मी जोडीदार म्हणून चालेल का, अशी कमेंट केली आहे.