Stray Dogs News : रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांबाबत दिलेल्या निर्देशांबाबत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील (एनसीआर) सर्व भटके श्वान हटवून त्यांना आश्रयस्थानी ठेवा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी प्रशासनाला दिले. भटके श्वान पुन्हा रस्त्यावर येता कामा नयेत, असेही बजावले. भटक्या श्वानांनी चावा घेण्याच्या घटना अत्यंत भयानक आहेत, असे निरीक्षण न्या. जे बी पारडीवाला आणि न्या. आर महादेवन यांच्या खंडपीठाने नोंदवलं. ज्यानंतर भटक्या श्वानांचा विषय चर्चेत आहे. अशात आता रोहित शर्माच्या पत्नीने भावनिक पोस्ट लिहिली आहे.

काय आहे रोहित शर्माच्या पत्नीची पोस्ट?

“त्यांना वाटतं की ही भटके कुत्रे त्रास आहेत. आमच्यासाठी मात्र ते हृदयाचे ठोके आहेत. भटक्या श्वान रस्त्यावर येता कामा नयेत असंही न्यायालयाने बजावलं आहे. रस्त्यावर प्रत्येक भटक्या कुत्र्याला हटवा असंही न्यायालयाने म्हटलं आहे. मग त्यांना त्यांचं स्वातंत्र्य, त्यांच्या हक्काचा सूर्यप्रकाश मिळणार नाही. आता आम्ही आमच्या ओळखीचे श्वान पाहू शकणार नाही. तुम्हाला वाटतं ते त्रास आहेत पण ते त्रास नाहीत ते आमचे मित्र आहेत. हे कुत्रे काही चहाच्या दुकानाबाहेर कुणी बिस्कीट देईल याची वाट बघत असतात. दुकानदारांसाठी ते रात्रीचे राखणार आहेत. हे काम त्यांना कुणी दिलं नसलं तरी इमाने इतबारे करतात. शाळेतून परतणाऱ्या मुलांना हे कुत्रे मित्रांसारखी साथ देतात. मला हे मान्य आहे की कुत्रे चावतात. पण काही कुत्र्यांनी हे केलं म्हणून सरसकट सगळ्या कुत्र्यांना कोंडायचं आणि एका ठिकाणी डांबायचं हे काही उत्तर नाही.”

कुत्र्यांना डांबून ठेवणं हा काही उपाय नाही-रितिका

मला वाटतं कुत्र्यांना डांबण्यापेक्षा त्यांची स्वच्छता राखणं, निगा राखणं, त्यांचं लसीकरण, निर्बिजीकरण वेळच्या वेळी करणं हे उपाय आहे. त्यांना रस्त्यावर जेवण देणारे लोक चुकीचं वागत आहेत असं वाटतं तर मग त्यांना खाऊ घालण्यासाठीचा परिसर ठेवा. तसंच ज्यांना कुत्रे दत्तक घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी ती तशी मोहीम राबवा, जनजागृती करा. काही कुत्र्यांनी मुलांना आणि लोकांना चावे घेतले म्हणून सगळ्या कुत्र्यांना डांबून ठेवायचं हा त्यांच्यावर अन्याय आहे. समाज म्हणून आणि माणुसकीच्या नात्याने आपण त्यांना सांभाळू शकत नसू तर आपल्या समाजाचा आत्मा हरवत चालला आहे. आज कुत्र्यांना डांबून ठेवत आहेत उद्या? उद्या कुणा कुणाला डांबून ठेवणार? असे प्रश्न उपस्थित करत रोहित शर्माच्या पत्नीने भावनिक पोस्ट लिहिली आहे.

नेमकं प्रकरण आहे तरी काय?

दिल्लीमध्ये एका लहान मुलीला भटके श्वान चावल्यामुळे रेबीज झाल्याचे वृत्त वाचून सर्वोच्च न्यायालयाने २८ जुलैला भटक्या श्वानांच्या मुद्द्यावर स्वत:हून खटला दाखल करून घेतला. दिल्ली सरकार, तसेच गुरुग्राम, नोएडा आणि गाझियाबादच्या पालिकांनी रस्त्यांवरून सर्व भटके श्वान आश्रयस्थानांमध्ये पाठवावेत, असे निर्देश खंडपीठाने दिले. याच्या अंमलबजावणीत कोणतीही तडजोड करता कामा नये, व्यापर सार्वजनिक हित विचारात घेऊनच हे निर्देश दिले जात असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाचे आदेश काय?

  • रोज पकडलेल्या आणि आश्रयस्थानांमध्ये पाठवलेल्या श्वानांची दैनंदिन नोंद ठेवावी.
  • श्वानांचे निर्बिजीकरण व लसीकरण करण्यासाठी तसेच त्यांची देखभाल करण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग ठेवावा.
  • कोणत्याही श्वानाला सोडून दिले नाही किंवा बाहेर काढले नाही याची खबरदारी घेण्यासाठी आश्रयस्थाने सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली असावीत.
  • ही गरज वाढत जाणार असल्यामुळे भविष्यात श्वानांच्या आश्रयस्थानांची संख्या वाढवावी.

राजधानी दिल्लीतील भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी दिल्ली महानगरपालिकेने (MSD) लवकरच ते अॅनिमल बर्थ कंट्रोल सेंटर्समध्ये सुधारणा करतील आणि झोन निहाय अँटी-रेबिज जागरुकता मोहिम राबवतील असे या महिन्याच्या सुरूवातीलाच जाहीर केले होते.