सालाबादप्रमाणे यंदाही ऑनलाइन फूड डिलेव्हरी अॅप असणाऱ्या स्विगीचा वार्षिक अहवाल समोर आला आहे. भारतीय कोणते पदार्थ सर्वाधिक मागवतात यासंदर्भातील अहवालामध्ये बिर्याणीने पुन्हा एकदा बाजी मारलीय. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण दर मिनिटाला स्विगीवरुन ११५ बिर्याणींची ऑर्डर दिली जाते. तर भारतामध्ये या वर्षी स्विगीवरुन मागवलेल्या सामोश्यांची संख्या ही न्यूझीलंडच्या लोकसंख्येइतकी आहे.
या वर्षी स्विगीवरुन भारतीयांनी तब्बल ५० लाख समोश्यांची ऑर्डर दिलीय. स्विगीवरुन मागवण्यात आलेल्या सर्वाधिक लोकप्रिय स्नॅक्स प्रकारामध्ये सामोसा अव्वल क्रमांकवर आहे. चिकन विंग्सपेक्षा सामोसा मागवणाऱ्यांचं प्रमाणे सहा पटींनी अधिक आहे. सामोश्याखालोखाल सर्वाधिक मागवण्यात आलेल्या पदार्थामध्ये पावभाजीचा क्रमांक लागलाय. तब्बल २१ लाख पावभाजी २०२१ मध्ये स्विगीवरुन मागवण्यात आल्यात.
नक्की वाचा >> ८ लाख किलो डोशाचे पीठ, टोमॅटो तर एवढे की ११ वेळा…; भारतातील ऑनलाइन किराणामाल शॉपिंगची थक्क करणारी आकडेवारी
रात्री १० वाजल्यानंतर पदार्थ मागवण्याच्या ट्रेण्डमध्ये चिज-गार्लीक ब्रेड, पॉपकॉर्न आणि फ्रेंच फ्राइजसारख्या पदार्थांना भारतीय प्राधान्य देत असल्याचं दिसत आहे. डेझर्ट म्हणजेच गोड पदार्थांमध्ये गुलाबजाम हा भारतीयांनी सर्वाधिक मागवलेला पदार्थ ठरला असून २१ लाख जणांना स्विगीवरुन २०२१ मध्ये गुलाबजामची ऑर्डर दिलीय. त्या खालोखाल १२ लाख ७० ऑर्डर्ससहीत रसमलाईचा क्रमांक लागतोय.
भारतीयांनी सर्वाधिक मागवलेल्या डीशमध्ये बिर्याणी मागील सहा वर्षांप्रमाणे यंदाही पहिल्या क्रमांकावर आहे. २०२० मध्ये दर मिनिटाला भारतीय ९० बिर्याणी मागवायचे. यंदा हा आकडा ११५ बिर्याणींवर गेलाय. म्हणजेच दर सेकंदाला स्विगीवर दोन बिर्याणींची ऑर्डर केली जाते. त्यातही चिकन बिर्याणी मागवणाऱ्यांचं प्रमाण हे व्हेज बिर्याणी मागवणाऱ्यांपेक्षा ४.३ टक्क्यांनी अधिक आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी ४ लाख २४ हजार नव्या युझर्सने स्विगीचा पहिल्यांदा वापर करताना चिकन बिर्याणी मागवलीय.
कोलकाता, लखनऊ, चेन्नई आणि हैदराबादमध्ये चिकन बिर्याणी ही सर्वाधिक मागवलेली डिश ठरली असली तरी मुंबईकरांची पहिली पसंती चिकन बिर्याणी नाहीय. मुंबईकर हे चिकन बिर्याणीपेक्षा डाळ खिचडीला प्राधान्य देत असल्याचं दिसून आलं आहे. मुंबईमधून करण्यात आलेल्या ऑर्डर्समध्ये डाळ खिचडीची संख्या ही चिकन बिर्याणीहून दुप्पट आहे.
यंदाच्या वर्षी आरोग्यदायी खाणं मागवणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. स्विगी हेल्थ हब या आरोग्यदायी खाणं पुरवणाऱ्या सेवेचा वापर २०० टक्क्यांनी वाढलाय. आरोग्यदायी खाण्याला प्राधान्य देणाऱ्या शहरांमध्ये बंगळुरु पहिल्या, हैदराबाद दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या स्थानी आहे. सोमवारी आणि मंगळवारी इतर कोणत्याही दिवसापेक्षा अधिक भारतीय आरोग्यदायी खाण्याला प्राधान्य देतात. किटो फूड्सच्या ऑर्डरमध्ये २३ टक्क्यांनी वाढ जालीय. तर व्हिगन आणि प्लाण्ट बेस फूड प्रकाराची मागणीही ८३ टक्क्यांनी वाढ झालीय.