TCS Employee Post: भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टीसीएसने काही दिवसांपूर्वी त्यांच्या एकूण मनुष्यबळापैकी दोन टक्के म्हणजेच जगभरातून १२ हजार कर्मचारी काढून टाकण्याचा निर्णय घेतला. यानंतर आयटी क्षेत्रात एकच खळबळ उडाली. त्यानंतर कंपनीत कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक मिळत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नुकतेच एका कर्मचाऱ्याने रेडिटवर त्याच्या मॅनेजरला दिलेल्या वाईट वागणुकीबाबत एक पोस्ट टाकली आहे. यातून आयटी क्षेत्रात सध्या कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे वागणूक दिली जात आहे, त्याचे उदाहरण पाहायला मिळते.

या कर्मचाऱ्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले, कंपनीसाठी १४ वर्ष देणाऱ्या आमच्या मॅनेजरला कंपनीने ‘नॉन-बिलेबल साधन’ ठरवले आहे. त्यामुळे त्याला तात्काळ राजीनामा देण्यास तर भाग पाडलेच. पण त्याच्या हक्काचा ‘सेव्हरन्स पे’ही देण्यात आला नाही.

मी टीसीएसमध्ये काम करत आहे. माझ्या मॅनेजरला १४ वर्षांचा अनुभव असूनही त्याला तात्काळ कामावरून काढून टाकण्यात आले, असे शीर्षक देऊन या कर्मचाऱ्याने सदर पोस्ट रेडिटवर शेअर केली आहे. कामाच्या ठिकाणी असलेली अशक्य आणि अतर्क्य परिस्थितीबाबत या पोस्टमध्ये भाष्य करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्याने पुढे म्हटले की, त्याच्या मॅनेजरसह त्यांच्या टीमला एका अमेरिकन क्लाईंटचे काम देण्यात आले होते. या क्लाईंटने आयबीएम सिस्टिमवर १५ ॲप्लिकेशन तयार केले होते, याचे त्यांना आधुनिकीकरण करून हवे होते. पण जेव्हा आम्ही प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली, तेव्हा आमच्या लक्षात आहे की, आधुनिकीकरण सोपे नाही. तर सुरुवातीपासून सर्व कोडींग करावे लागणार आहे.

This_Hedgehog_4115 या रेडिट युजरने सदर पोस्ट शेअर केल्याचे फायनान्शियल एक्सप्रेसने म्हटले आहे. कंपनीच्या व्यवस्थापकांना याची जाणीव होती, तरी त्यांनी अशक्य गोष्ट आमच्या टीमच्या माथी मारली होती. एका रात्री आमच्या टीममध्ये आणखी १० जण देण्यात आले आणि महिन्याभराच्या आत १५ ॲप्लिकेशनचे आधुनिकीकरण करण्याचे आदेश देण्यात आले. पण हे पूर्णपणे अवास्तव असे काम होते.

क्लाईंटचा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण करून दिल्यानंतरच टीसीएसला त्यांच्या कामाचे पैसे मिळतात. चार महिने या प्रकल्पावर काम केल्यानंतर लक्षात आले की, एकाही ॲप्लिकेशनचे आधुनिकीकरण करणे जमलेले नाही.

मॅनेजर ‘नॉन-बिलेबल साधना’चा बळी

यानंतर कंपनीने तडकाफडकी मॅनेजरची हकालपट्टी केली. ढीसाळ काम आणि प्रकल्प पूर्ण करण्यात असमर्थता दर्शविल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण न झाल्यामुळे याचे बिल मिळणार नव्हते. त्यामुळे मॅनेजरवर याचे खापर फोडण्यात आले. त्याला तीन महिन्यांची नोटीस न देता तात्काळ निघून जाण्यास सांगितले. टीसीएसमध्ये तीन महिन्यांचा नोटीस परियिड आहे. तसेच काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना ‘सेव्हरन्स पे’ही दिला जातो. पण आमच्या मॅनेजरला हे मिळाले नाही.

सदर पोस्टकर्त्याने केलेल्या दाव्यानुसार, मॅनेजर विवाहित असून त्याला दोन मुली आहेत. त्यांच्या सारख्या निष्ठावान कर्मचाऱ्याबरोबर जे झाले, त्यावरून आम्हाला धक्का बसला आहे.

फायनान्शियल एक्सप्रेसने या बातमीबद्दल टीसीएसशी संपर्क साधला आहे. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतर या बातमीत ती अपडेट केली जाईल.

आयटी क्षेत्र सुरक्षित राहिले नाही – रेडिट युजर्स

एका रेडिट युजरने या पोस्टखाली कमेंट करत म्हटले की, कोणत्याही कर्मचाऱ्याला राजीनामा देण्यासाठी भाग पाडले जाऊ शकत नाही. यावर पोस्टकर्त्याने म्हटले की, एचआरने त्याला राजीनामा देण्यास सांगितले होते. त्याने तसे केले नाही तर त्याला कामावरून काढून टाकले जाणार होते. असे झाले असते तर त्याला पुढील नोकरी शोधण्यात अडचण आली असती.

आणखी एका युजरने कमेंट करत म्हटले की, अजूनही पालकांना आपली मुले आयटी क्षेत्रात जावीत, असे वाटते. हे क्षेत्र आता पूर्वीसारखे सुरक्षित राहिलेले नाही. इतर क्षेत्रात आताच वळणे सोयीस्कर.

(या बातमीत दिलेली माहिती ही रेडिटवर केलेल्या पोस्टवर आधारित आहे. त्यातील दावे आणि व्यक्त केलेली मते ही पोस्टकर्त्यांची आहेत. आम्ही या दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही.)