अमेरिकेतील प्रसिद्ध विद्युत कार म्हणजेच इलेक्ट्रीक कार उत्पादक कंपनी ‘टेस्ला’चे प्रमुख एलॉन मस्क यांच्यावर सध्या भारतामधून ऑफर्सचा पाऊस पडतोय. भारतात सरकारी आव्हानांचा सामना करावा लागत असल्याची नाराजी मस्क यांनी व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मस्क यांना आवतण दिले आहे. ‘टेस्ला’चा प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याची हमी पाटील यांनी मस्क यांच्या ट्विटला रिप्लाय करुन दिलीय. मात्र अशाप्रकारे मस्क यांना निमंत्रण देणारे पाटील एक एकमेव मंत्री नसून मंत्र्यांमध्येच मस्क यांना निमंत्रण देण्यासाठी चढाओढ असल्याचं चित्र दिसत आहे.

प्रकरण काय?
‘टेस्ला’चे उत्पादन भारतात आणण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर एलॉन मस्क यांनी सध्या सरकारी पातळीवर अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असून, उत्पादनाच्या प्रारंभाची वेळ सांगू शकत नाही, असे उत्तर दिले होते. मस्क यांच्या या विधानानंतर केंद्रातील अधिकाऱ्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. भारतातील उत्पादनासाठी वचनबद्धता जाहीर केल्याशिवाय ‘टेस्ला’ शुल्क कपातीची मागणी करू शकत नाही, असे भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मोदी सरकार व ‘टेस्ला’मधील या शाब्दिक चकमकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करत मस्क यांना महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण दिले.

राजकीय खेळी
महाराष्ट्र हे भारतातील सर्वात प्रगतशील राज्यांपैकी एक असून ‘टेस्ला’चा प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यासाठी आम्ही तुम्हाला निमंत्रण देतो. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे जयंत पाटील यांनी मस्क यांना उद्देशून लिहिलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. जयंत पाटील यांनी या ट्विटद्वारे एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. भाजपावर कुरघोडी करताना ‘टेस्ला’ची गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठीचे प्रयत्न त्यांनी केले आहेत.

भाजपाची सत्ता असणारी राज्ये की…
‘टेस्ला’सारखी कंपनी महाराष्ट्राचीच निवड करेल, असे वाटत असताना कार्यालयासाठी मस्क यांनी बंगळुरूची निवड केल्याने ‘टेस्ला’चा प्रकल्प भाजपाची सत्ता असलेल्या राज्यातच जाणार असे वातावरण तयार झाले होते. पण मस्क यांच्या ट्विटमुळे इतर राज्यांना गुंतवणूक आकर्षित करण्याची संधी मिळाली. जयंत पाटील यांनी ती संधी साधत मस्क यांना निमंत्रण दिले. याचपद्धतीने इतरही अनेक राज्यांच्या मंत्र्यांनी थेट मस्क यांना निंत्रण दिल्याचं पहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणी कोणी दिलं निमंत्रण?
तेलंगणचे मंत्री के़ टी़ रामाराव यांनी सर्वात आदी मस्क यांना गुंतवणुकीसाठी निमंत्रण दिले होते. तेलंगणमध्ये उद्योग उभारण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याची हमी त्यांनी ट्विटद्वारे दिली होती. त्याचप्रमाणे पंजाबमधील काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनीही मस्क यांना ट्विट करुन पंजाबमध्ये टेस्लाचा कारखाना उभारण्याचं आव्हान केलं होतं. याशिवाय तामिळनाडूचे मंत्री टी. आर. बी. राजा, पश्चिम बंगलाचे मंत्री गुलाम रब्बानी यांनीही ट्विटरवरुन मस्क यांना आपआपल्या राज्यात येण्यासाठी थेट ट्विटरवरुन ऑफर दिल्यात.

मस्क यांची कंपनी ही सध्या जगातील आघाडीची इलेक्ट्रॉनिक कार निर्मिती करणारी कंपनी आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे मस्क हे आता यावर काय निर्णय घेतात किंवा भारतातील कोणत्या राज्याला ते प्राधान्य देतात हे येणाऱ्या कालावधीमध्येच स्पष्ट होईल.