लांब पल्ल्याचा प्रवास करताना आपण नेहमीच सहप्रवाशांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. यामुळे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव चांगला असेल, तर आपल्याला प्रवास करता करता एक चांगला मित्र मिळतो. विमानातून प्रवास करणाऱ्या एका महिलेने नेमका असाच विचार केला. मात्र सहप्रवाशासोबत मैत्री करु पाहणाऱ्या या महिलेची ओळख एका विचित्र माणसासोबत झाली.

गर्ल ऍट वॉर पुस्तकाची लेखिका आणि शिक्षिका सारा नोविकला कायम लक्षात राहिल, असा विमान प्रवास घडला आहे. या प्रवासात साराला एक विचित्र सहप्रवासी भेटला. आपल्या या अनुभवाची माहिती साराने ट्विटरवरुन दिली आहे. साराचे सर्वच ट्विट अत्यंत धक्कादायक आहेत. साराचा सहप्रवासी एका संग्रहालयाला भेट देण्यासाठी सिनसिनाटीला जात होता. सारा आणि या सहप्रवाशामध्ये एक सीट होती. या सीटवर कोणीच बसले नसल्याने साराला आनंद झाला. मात्र हा आनंद काही काळच टिकला. कारण थोड्याच वेळात सहप्रवाशाने त्या रिकाम्या सीटवर एक बाहुली ठेवली.

सीटवर बसून चक्क बाहुली प्रवास करत असल्याचे वाचून कदाचित तुम्हाला धक्का बसला असेल. मात्र ही अजब कहाणी एवढ्यावरच थांबत नाही. साराच्या सहप्रवाशाने त्याच्या बाहुलीसाठी तिकीटदेखील काढले होते. बार्बरा नावाच्या प्रवाशाला शोधताना विमानातील कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. मात्र त्यानंतर बार्बरा हे बाहुलीचे नाव असल्याची माहिती कर्मचाऱ्यांना मिळाली.

साराने विमानातून प्रवास करणाऱ्या या बाहुलीचे फोटो ट्विटरवर शेअर केलेत. एक विचित्र सहप्रवासी आणि त्या प्रवाशासोबत असणारी त्याची बाहुली यामुळे साराला तिचा विमान प्रवास कायम लक्षात राहील.