सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीमध्ये दिवसाढवळ्या कोट्यवधी रुपयांची खनिज चोरी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान प्रांताधिकारी हेमंत निकम म्हणाले, असा एक प्रकार उघडकीस येताच महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे त्यामुळे आता अनधिकृत मायनिंग उत्खनन होणार नाही.

शासकीय जमिनीवर जेसीबी मशीन लावून उत्खनन करून खनिज चोरी केली जात असून, त्याची वाहतूक मोरगाव येथे अवैध साठ्यासाठी केली जात आहे. या प्रकारामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असून, महसूल प्रशासन आणि संबंधित अधिकारी मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत. आडाळी एमआयडीसीमध्ये उद्योग सुरू होण्यापूर्वीच खनिज दलालांनी हैदोस घातला आहे. भूखंड सपाटीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात खनिज उत्खनन करून दिवसाढवळ्या आणि रात्री त्याची वाहतूक केली जात आहे. महसूल अधिकारी आणि औद्योगिक विकास क्षेत्र अधिकाऱ्यांच्या संगनमताने ही खनिज चोरी सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

आडाळी एमआयडीसीमधील खनिज मोरगाव येथील खाजगी जमिनीवर साठवून ठेवले जात असून, तेथून रात्रीच्या वेळी डंपरच्या साहाय्याने त्याची वाहतूक केली जात आहे. या अवैध साठ्याप्रकरणी जमीन मालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडाळी एमआयडीसी आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात खनिज चोरी होत असून, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. जिल्हाधिकारी, खनिकर्म अधिकारी, दोडामार्ग तहसीलदार आणि प्रांताधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आडाळी एमआयडीसीमध्ये अनधिकृत उत्खनन महसूल विभागाच्या कारवाईमुळे थांबले.

आडाळी एमआयडीसी (MIDC) परिसरात सपाटीकरणाच्या नावाखाली सुरू असलेले अनधिकृत मायनिंग उत्खनन महसूल विभागाने तात्काळ बंद केले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली. यापुढे एमआयडीसी भागात अशा प्रकारचे उत्खनन होऊ नये यासाठी महसूल विभागाने कडक पाऊले उचलली आहेत. या संदर्भात बोलताना प्रांताधिकारी निकम म्हणाले की, अनधिकृत उत्खननाचा प्रकार उघडकीस येताच तातडीने कारवाई करण्यात आली. आता तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांचे भरारी पथक तसेच तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामुळे या भागातील वाहतुकीवर करडी नजर ठेवता येणार आहे.

प्रांताधिकाऱ्यांनी स्वतः एमआयडीसी परिसराचा दौरा केला. त्यावेळी त्यांना पाणी टाकीचे काम सुरू असल्याचे आढळले. कळणे मायनिंगच्या नावाखाली कोणतीही वाहतूक होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. याव्यतिरिक्त, मोरगाव येथे अनधिकृतपणे साठवून ठेवलेले सुमारे दोनशे ते अडीचशे ब्रास मायनिंग जप्त करण्यात आले आहे. ही जागा नॉन-ॲग्रीकल्चर (NA) नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी तहसीलदारांना कठोर निर्देश देण्यात आले आहेत, असेही प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी सांगितले. महसूल विभागाच्या या तत्पर कारवाईमुळे आडाळी एमआयडीसी परिसरातील संभाव्य गैरप्रकार टळले आहेत.