आपल्या प्रेयसीवर प्रभाव टाकण्याची प्रत्येक प्रियकराची स्टाईल वेगवेगळी असते. त्यातून जर लग्नाची मागणी घालायची असेल तर प्रस्ताव हटके असायलाच हवा ना ! गुलाबाचे फुल देत, एका गुडघ्यावर बसून मागणी घालण्याची कृती आता अनेकांसाठी जुनी झाली. त्यामुळे असे प्रियकर काहीतरी भन्नाट करायचा प्रयत्न करतात. त्यातलाच एक किओ वी लुंग होय. आपल्या प्रेयसीला लग्नाची मागणी घालण्यासाठी हा गडी चक्क जगातील उंच पुलाच्या टोकावर चढला. त्यामुळे त्याची आणि त्याच्या अनोख्या ‘प्रपोजलची’ सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरू आहे.
वाचा : मुलीच्या लग्नात पित्याने ठेवले कॅशलेस रिसेप्शन
किओ वी लुंग हा छायाचित्रकार आहे. त्याने हल्लीच चीनच्या Beipanjiang या पुलाला भेट दिली. या पुलाच्या सगळ्याच उंच टोकावर तो चढला. ज्या ठिकाणी पुलाला जोडून ठेवणा-या केबल एकत्र केल्या जातात, त्या सर्वोच्च बिंदूच्या ठिकाणी हातात फलक घेऊन त्याने आपल्या प्रेयसीला लग्नाची मागणी घातली. यात त्याच्या तोलही गेला असता. पण, जीवाची पर्वा न करता त्याने या पुलावर चढत तिला मागणी घातली. किओ वी लुंग याचे एका पोलिश तरुणी मार्टावर प्रेम आहे. तिला सिनेमातल्या नटासारखे गुलाबाचे फुल आणि अंगठी घेऊन मागणी घातलेली आवडणार नाही हे त्याला ठाऊक होते. म्हणून त्याने तिला अशा हटके त-हेने मागणी घालण्याचे ठरवले.
किओ वी लुंग याची प्रेमकाहाणी काहीशी हटकेच आहे. किओ वी लुंग याचे टोकिओ शहरात पाकिट हरवले होते. त्यामुळे त्याच्याजवळ ना पैसे होते, ना कार्ड. टोकिओच्या रस्त्यावरून तो भुकेला फिरत होता. तेव्हा मार्टाने त्याला पाहिले आणि खाण्यासाठी एका हॉटेलमध्ये घेऊन गेली. ओळख नसतानाही त्याची मदत केल्याने किओ मार्टाच्या प्रेमात पडला. म्हणूनच त्याने मार्टाला लग्नासाठी विचारायचे ठरवले. किओच्या प्रेयसीनेही त्याला लग्नासाठी होकार दिला आहे. त्यामुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण दुसरीकडे त्याच्यावर टिकाही केली जात आहे. त्याने प्रसिद्धी मिळण्यासाठी असे केले असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.