Snake Viral Videos: साप म्हटलं की भल्या भल्यांना घाम फुटतो. त्यातही कोब्रा पाहिला तर भीती गाळण उडते. ग्रामीण भाग आणि शहरात हिरवळीच्या ठिकाणी अनेकदा सापांचे दर्शन होत असते. आता अनेक ठिकाणी सर्पमित्र सापांना पकडून त्यांना सुरक्षित निवासात सोडण्याचे काम करतात. अनेक सर्पमित्रांचे सोशल मीडियावर अकाऊंट्स असून ते साप हाताळतानाचे व्हिडीओ तिथे पोस्ट करत असतात. या व्हिडीओजना कोट्यवधी व्ह्यूज मिळतात. सध्या अशाच एका सर्पमित्राचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सर्पमित्र एका भल्या मोठ्या कोब्रा नागाशी मित्र असल्यासारखा वागत आहे.

इंडोनेशियन सर्पमित्र आणि डिजिटल कंटेट क्रिएटर म्हणून परिचित असलेल्या मुहम्मद पंजीने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. पिवळा टी-शर्ट आणि जीन्सवर बसलेला मुहम्मद पंजी एका विशालकाय कोब्रासमोर आरामात बसून त्याच्याशी मित्रासारखा वागताना दिसतो.

नागाने फणा वर केलेला असून त्याचे तोंड उघडे आहे आणि तो कधीही हल्ला करेल अशा आवेशात दिसत आहे. पण पंजी त्याच्यासमोर शांतपणे बसून आहे. नागाच्या डोळ्यात डोळे घालून पंजी त्याच्याशी संवाद साधतोय, अशा पद्धतीने शांतपणे पाहतो. हळूहळू नागही त्याची आक्रमकता कमी करतो. त्यानंतर पंजी शांतपणे त्याचे कपाळ नागाच्या फण्यावर ठेवतो. काही वेळ नाग आणि पंजी त्याच स्थितीत राहतात.

मुहम्मद पंजीने ज्या खुबीने विशालकाय कोब्राला शांत करून त्याच्याशी एकरूप होण्याची किमया साधली, त्याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटत आहे. सामान्यांना शक्य न होणारी बाब पंजीने लीलया पार पाडल्यामुळे त्याचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.

मुहम्मद पंजीची कृती पाहताना चांगली वाटत असली तरी ती हे नको ते साहस अंगावरही बेतण्याची शक्यता असते. आजवर अनेक सर्पमित्रांना साप चुकीच्या पद्धतीने हाताळताना दंश झाला आहे. वेळीच औषधोपचार मिळाले नाहीत तर मृत्यूही ओढवू शकतो.

मुहम्मद पंजीच्या व्हिडीओला सात कोटी व्ह्यूज आणि १९ हजार कमेंट्स मिळाल्या आहेत. अनेकांनी पंजीच्या आत्मविश्वास आणि त्याच्या कौशल्याचे कौतुक केले आहे. तर काहींनी त्याला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. अनेकांनी त्यांना सापांची वाटणारी भीती व्यक्त केली. तर एका युजरने म्हटले की, सर्प केवळ पवित्र आत्म्यांनाच इतक्या जवळ येऊ देतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुहम्मद पंजीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साप हाताळतानाचे अनेक व्हिडीओ आहेत. विशालकाय कोब्रा, अजगर असे सरीसर्प त्याने हाताळले असून त्यांना जीवनदान दिलेले आहे.