गाढव बिचारा गरीब प्राणी, त्याला किंमत ती काय? आपल्यासाठी हा प्राणी नेहमीच मस्करीचा विषय ठरला आहे. पण आता तुम्हाला आम्ही अशा गाढवाबद्दल सांगणार आहोत जो थट्टा मस्करीचा नाही तर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या गाढवाचं नाव आहे टिपू. सोनीपथ येथे राहणाऱ्या राजसिंह यांच्या मालकीचे हे गाढव आहे. त्याच्या किंमतीमुळे तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या गाढवाला खरेदी करण्यासाठी पाच लाखांची बोली लागली होती, इतकंच नाही तर आता या गाढवाची बाजारातील किंमत चक्क दहा लाख झालीय. आता तुम्ही म्हणल १० लाख रूपये मोजण्याइतकं या गाढवामध्ये नक्की आहे तरी काय? हा टिपू म्हणजे सामान्य गाढव नाही.

एका सामान्य गाढवापेक्षा टिपूचा आकार मोठा आहे. एका राजाप्रमाणे त्याचे मालक राजसिंह त्याची सेवा करतात. टिपूला दररोज खाण्यासाठी ५ किलो चणे, चार लिटर दूध, २० किलो भाज्या लागतात. टिपू तर आपल्या मुलासारखा आहे असं राजसिंह अभिमानाने सांगतात. टिपूच्या रोजच्या खुराकीवर राजसिंह जवळपास १ हजार रूपये खर्च करतात. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधला एक व्यापारी या गाढवासाठी ५ लाख रुपये मोजायला तयार झाला होता, पण राजसिंह २० लाखांच्या आसपास टिपूची विक्री करणार असल्याची चर्चा आहे.