वय हे केवळ आकडे असतात, हे वाक्य आपण खूप वेळा ऐकत असतो. शिवाय हे वाक्य वयस्कर लोकांसाठी वापरलं जातं. कारण अनेक वयस्कर लोक असे असतात जे आपल्या वयाच्या साठीतही तरुणांसारखी कामं करतात. याचं कारण म्हणजे त्यांच्या मनात काहीतरी करण्याची जिद्द असते. सध्या सोशल मीडियावर अशाच काही वयस्कर लोकांची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
या चर्चेला कारण ठरलं आहे त्यांनी केलेलं ‘स्कायडायव्हिंग.’ हो कारण अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये ६० वर्षांवरील तब्बल १०१ ज्येष्ठ नागरिकांनी जागतिक विक्रम मोडला आहे. कॅलिफोर्नियामध्ये एका वयस्कर लोकांच्या गटाने स्कायडायव्हिंग स्पर्धेत भाग घेत सर्वांना आश्चर्यचकीत केलं आहे. स्कायडायव्हर्स ओव्हर सिक्स्टी नावाच्या या गटाने हवेत दोन रचना करत दोन जागतिक विक्रम मोडले आहेत.
वयस्कर लोकांनी केलेल्या या नव्या विक्रमाची माहिती देताना कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या संस्थेने सांगितले की, १०१ जंपर्सनी त्यांच्या चौथ्या प्रयत्नात स्नोफ्लेक फॉर्मेशन यशस्वीरित्या तयार केले. दरम्यान, वयस्कर लोकांनी ‘स्कायडायव्हिंग’ केल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तर यामध्ये भाग घेतलेल्या लोकांचे नेटकरी खूप कौतुक करत आहेत. शिवाय या वयस्कर लोकांचे स्कायडायव्हिंग करतानाचे फोटो खूप सुंदर दिसत असून ते अनेकांना आवडले आहेत.
फोटो व्हायरल –
स्कायडाइव्ह पॅरिस नावाच्या एका इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या घटनेचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, “एक नव्हे दोन जागतिक विक्रम केले आहेत. हे स्वप्न साकार करण्यात मदत केल्याबद्दल सर्वांचे आभार!”