आजकाल जोडप्यांमध्ये ब्रेकअप होणं सामान्य झालं आहे, अनेकदा प्रेमाने सुरू झालेलं नातं भांडणात संपतं आणि आपल्या जोडीदाराने आपल्याला धोका दिला या भावनेने त्याचा बदला घेण्यासाठी अनेकजण टोकाचं पाऊल उचलतात. या संबंधित अनेक घटना आपण सोशल मीडियावर पाहत आणि वाचत असतो. पण सध्या एका जोडप्यांचे ब्रेकअप झाल्यानंतर एका तरुणीने तिच्या प्रियकराला एक अनोखं पार्सल पाठवून गोड बदला घेतला आहे, ज्याची चर्चा सध्या सोशलम मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. शिवाय या घटनेतील तरुणीने तिच्या जुन्या प्रियकराला असं गिफ्ट पाठवलं आहे, जे पाहिल्यानंतर अनेकांनी आपलं हसू आवरणं कठीण होतं आहे.
नमन (@yourtwtbro) नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. तो शेअर करताना त्याने लिहिलं आहे की, त्याच्या रूममेटला त्याच्या जुन्या प्रेयसीकडून एक पार्सल मिळाले आहे. यावेळी त्याने जो स्क्रीनशॉट शेअर केला आहे, त्यामध्ये लिहिलं आहे “तुला instamart वरून काहीतरी पाठवले आहे, ते प्रेमाने परिधान कर, ते बसत नसेल तर मला कळव, मी तुम्हाला याच्यापेक्षा मोठे पाठवीन.” पण या प्रेयसीने नेमकं काय पार्सल पाठवलं आहे हे समजल्यावर तुम्हीदेखील थक्क व्हाल यात शंका नाही. हो कारण या तरुणीने पार्सलमध्ये कचऱ्याच्या पिशव्या पाठवल्या आहेत. शिवाय तिने त्याला त्या घालायचा सल्ला दिला आहे, हे वाचून अनेकांना हसू आवरणं कठीण झालं आहे.
मंगळवारी पोस्ट केलेल्या या ट्विटला आतापर्यंत ६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे स्विगी इन्स्टामार्टनेदेखील या ट्विटची दखल घेतली असून त्यांनी एक मजेदार रिप्लाय दिला आहे. स्विगी इन्स्टामार्टने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे, “तिला बँडेज ऑफर करायची होती, पण एवढ्या मोठ्या जखमेला ती छोटी पडली असती.”
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
हे ट्विट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, शिवाय नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, “हे मोठ्या प्रमाणात खरेदी करावे लागेल आणि काही लोकांना पाठवावे लागेल.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं “देवा शपथ मी न हसण्याचा खूप प्रयत्न केला,” तर आणखी एकाने लिहिलं, मी अजूनही हसत आहे. तर काही लोकांनी बिचाऱ्याबरोबर खूप वाईट झालं असंही लिहिलं आहे.