आपण कधी परदेशात गेलो आणि तिथे आपल्या राज्यातील एखाद्या खाद्यपदार्थ दिसला तर आपल्या आनंदाला पारावार उरत नाही. कारण इतक्या लांब आपल्या भागातील एखादा खाद्यपदार्थ खायला मिळणं तसं दुर्मिळ असतं, त्यामुळे साहजिकच आपणाला आनंद होतो. असे अनेक व्यावासायिक आहेत ज्यांनी आपल्या भागातील खाद्यपदार्थांची भुरळ परदेशातील लोकांनाही घातली आहे. मुंबईचा वडापाव तर आता जगप्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे वडापाव असो वा पुरणपोळी आता परदेशात महाराष्ट्रीय फूड म्हणून ओळखले जातात आणि तेथील लोक देखील ते आवडीने खातात. अशातच आता एका मुंबईकराने बनविलेल्या ‘आईस्क्रीम’ ची भुरळ अमेरिकेतील लोकांना पडली असून ते विकत घेण्यासाठी तेथील लोक रांगा लावत आहेत.
या आईस्क्रीमच्या दुकानाचं नाव आहे ‘Pints Of Joy’ असं आहे, ते केतकी दांडेकर आणि अर्शिया शेख नावाच्या दोन मैत्रिणी चालवतात. ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी ‘यशस्वी उद्योजक’ या वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात या तरुणींची प्रेरणादायी कहाणी सांगितली आहे. ते लिहितात की, केतकी मुंबईची, दांडेकर घराण्यातली. दांडेकर घराणं शाईपासून रंगांच्या व्यवसायात विस्तारलेलं. गोविंद परशुराम दांडेकर आणि दिगंबर परशुराम दांडेकर या दोघा भावांनी १९३१ साली सुरु केलेला हा व्यवसाय. केतकीने शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत घेतल्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेली. लग्नानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली. तिनं वाणिज्य विषयातली डॉक्टरेट संपादित केली आणि अमेरिकेतील पेमेंट इंडस्ट्रीशी संलग्न अशा एका फिनटेक कंपनीत ती कामाला लागली. केतकी आणि अर्शिया एकाच शहरात राहतात, दोघींची मुलं एकाच शाळेत शिकतात. अर्शियाचं बालपण भारतात आणि अबूधाबीत गेलं आहे.
व्यवसाय सुरु करण्याची कल्पना कशी सुचली?
कोरोना काळात आलेल्या मंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या ज्यामध्ये केतकी आणि अर्शियालाही आपली नोकरी गमवावी लागली. या काळात फारसं कुठे जाणं, कुणाला भेटणं शक्य नव्हतं त्यावेळी जवळच असणारे दांडेकर आणि शेख कुटुंबीय एकमेकांना भेटत असत तेएकमेकांच्या घरी ये-जा करायचे. असेच एक दिवस दांडेकर आणि शेख कुटुंबीय जेवणानिमित्तानं एकत्र भेटले असताना केतकीनं जेवणानंतर घरीच बनवलेलं आईस्क्रीम खायला दिलं. शेख कुटुंबियांना ते इतकं आवडलं की, केतकीच्या या आईस्क्रीमचे दुकान टाकण्याचा विचार सर्वांच्या डोक्यात आला आणि त्यांनी केतकीने आईस्क्रीमचा व्यवसाय सुरु करावा यासाठी आग्रह केला.
दोन्ही कुटुंबीयांनी तिला आश्वस्त केलं, तु हा व्यवसाय सुरु कर, आम्ही तुजाबरोबर आहोत. यानंतर दोन्ही कुटुबीयांनी आवश्यक त्या सर्व सरकारी परवानग्या घेतल्या. यावेळी त्यांना सनीवेलमधेच त्यांना एक किचन भाड्यानं मिळालं, आरोग्य खात्याचे परवाने मिळाले. कॅलिफोर्निया डेअरी अँड फूड अँड्मिनिस्ट्रेशनची परवानाविषयक कागदपत्रं हातात आली आणि दोघींनी किरकोळ विक्रीचं एक युनिट सनीवेलमधील किचनच्याच परिसरात सुरु केलं. सनीवेलमधल्या एल कमिनो रस्त्यावर ‘Pints Of Joy’ नावाचं अस्सल भारतीय चवीचं आईस्क्रीम पार्लर सुरु झालं. वर्षभरात विक्रीची कमाल पातळी गाठली गेली आणि आता जिथे ग्राहकांना येऊन बसता येईल, आईस्क्रीमचा मनसोक्त आस्वाद घेता येईल अशा नव्या, मोठ्या जागेत जायला हवं, याची गरज तीव्रतेनं भासायला लागली. हीच गरजओळखून सर्वांच्या साथीने दोघींनी अत्यंत कठीण काळात कंपनी उभी केली आणि तिचा विस्तारही केला.
अस्सल देशी चवीचे आईस्क्रीम –
केतकी आणि अर्शियानं आईस्क्रीमचे जे नवनवे प्रकार सुरु केले, त्यात अंडंविरहित, व्हेगन आईस्क्रीम जसं आहे, तसंच हातानं बनवलेलं, फळांच्या मूळ चवीचं अत्यंत ताजं आईस्क्रीमही आहे. जी अनेक प्रकारची फळं केतकी आईस्क्रीम बनवण्यासाठी वापरते, ती सर्व ताजी फळं असतात. कुठल्याही फळाचा कृत्रिम गंध त्यात वापरला जात नाही. त्यामुळे हापूस आंब्याचा पल्प खास मागवला जातो, सीताफळाचा गर मागवला जातो. सीझननुसार आणि त्या त्या महिन्यात येणाऱ्या सणांनुसारही नवनवे फ्लेव्हर्स देण्याचा केतकी आणि अर्शियाचा प्रयत्न असतो.
तिळगूळ, कोकम ते तिखट मीठ लावलेला पेरूचे फ्लेव्हर-
जानेवारीत तिळगूळ फ्लेव्हरचं, उन्हाळ्याच्या दिवसात येणाऱ्या कोकम आणि कैरी सरबताच्या फ्लेव्हरचं, दिवाळीत मिठाईत मिळणाऱ्या गुलाबजाम, म्हैसूर पाक, काजू कतली, मोतीचूर, रसमलाई, रबडीच्या चवीचं, आणि थंडीच्या दिवसात आलेपाक, मेपल पेकन, आणि ब्लॅक फॉरेस्टच्या फ्लेव्हरचं आईस्क्रीम केतकी आणि अर्शिया देतात. पण ग्राहकांना ते फ्लेव्हर देण्यापूर्वी किचनमध्ये त्याची ट्रायल घेतली जाते. हापूस आंबा, तिखट मीठ लावलेला पेरू, पिस्ता कुल्फी, गुलाबजाम, बिस्कॉफ, फ्रेश स्ट्रॉबेरी, फिग आणि वॉलनट, लिची, मीठा पान हे ‘Pints Of Joy’चे लोकप्रिय फ्लेव्हर आहेत.
व्हेगन/नॉन डेअरीवाल्यांसाठी विशेष फ्लेव्हर्स –
मुंबई-पुण्यासारख्या महानगरात असणाऱ्या नैसर्गिक फ्लेव्हर्सच्या पुढची रेंज केतकी आणि अर्शिया उपलब्ध करून देताहेत. मसाला पान घातलेला खवलेल्या नारळाचा लाडू पाहून गुलकंद कोकोनट फ्लेव्हरची कल्पना केतकीला सुचली आणि ती ग्राहकांना आवडलीही. व्हेगन/नॉन डेअरीवाल्यांसाठी नारळाचं दूध वापरून बनवलेले विशेष फ्लेव्हर्स आहेत, त्यातही आंबा आणि चॉकलेट विशेष लोकप्रिय आहे.
केतकी आणि अर्शिया यांनी स्वतःपासून सुरु केलेला व्यवसाय आता वाढत वाढत १३ कर्मचारी चालवताहेत. शिवाय या व्यवसायाची किती उलाढाल होते याच्या तपशिलात जाण्याची गरज त्यांना भासत नाही, कारण दुकानाबाहेर खवय्यांच्या लागणाऱ्या रांगा आणि ग्राहकांची संख्याच ‘Pints Of Joy’च्या फ्रँन्चायझीला किती प्रतिसाद आहे ते दाखवते. बे एरिया तसा ९ काऊंटीजचा मिळून बनला आहे. त्याचं भौगोलिक क्षेत्रच १८ हजार चौरस किलोमीटर इतकं मोठं आहे. संपूर्ण बे एरियाची लोकसंख्या ७० लाखांच्या घरात आहे आणि त्यात भारतीय मोठ्या संख्येत आहेत. ते सर्व आपले संभाव्य ग्राहक आहेत असा विचार करून त्या पुढीलयोजन आखत आहेत. कोरोनानं देऊ केलेल्या संधीचं सोनं केतकी आणि अर्शिया चांगल्या पद्धीतेने केलं असून संकटाचं संधीत रूपांतर कसं करता येतं हेच या दोघींच्या यशस्वी वाटचालीतून दिसून येत आहे.