शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्ये आपली दहशत पसरावी यासाठी बिहारच्या शाळेतील दोन अल्पवयीन मुलांनी एका मुलाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ काढून त्यांनी तो इतर विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल देखील केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होऊन सोशल मीडियावर याचे पडसाद उमटल्यानंतर महिनाभराने पोलिसांनी अखेर या मुलांविरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे.
बिहारमधील मुजफ्फरपूर येथील एका शाळेमधला हा व्हिडिओ आहे. या शाळेतील दोन भावंडांनी त्यांच्याच वयाच्या एका मुलाला अमानुषपणे मारहाण केली. नंतर इतरही विद्यार्थ्यांना आपला धाक दाखवण्यासाठी या दोघा भावंडांनी त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल केला. ही दोघेही भावंडं बिहारमधील कुख्यात गुंड शशिभूषणची मुले आहेत. शशिभूषण हा गुंड २०१३ पासून तुरुंगाची हवा खातो आहे. हत्या, लूटमार, खंडणी वसूली यासाख्या आरोपांमुळे तो जेलची हवा खात आहे. आता त्याची मुलही त्याच्याच पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे. ही दोन्ही भावंडे मुजफ्फरपुरमधल्या केंद्रीय विद्यालयात शिकतात. शाळेतील त्यांच्या गैरवर्तणुकीला कंटाळून एका विद्यार्थ्याने शिक्षकांकडे याची तक्रार केली आणि याचा सूड उगवण्यासाठी या दोन भावंडांनी आपल्या काही मित्रांसोबत मिळून या मुलाला मारहाण केली.
२५ ऑगस्टला या मुलाला मारहाण झाल्याचे कळते पण पोलिसांनी मात्र या प्रकरणाची दखल घेतली नव्हती. अखेर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत या दोन्ही भावंडावर गुन्हा नोंदवला आहे. शाळेने या दोन्ही मुलांना १० दिवसांसाठी निलंबित केले आहे. पण ही मारहाण शाळेत झालीच नसल्याचा दावा शाळेने केला आहे. ज्या मुलाला ही मारहाण करण्यात आली आहे त्याच्या कुटुंबियांनी मात्र या प्रकरणाची पोलिसात तक्रार नोंदवायला नकार दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Oct 2016 रोजी प्रकाशित
Viral Video : शाळेत ‘गुंडाराज’, दहशत पसरवण्यासाठी विद्यार्थ्याला बेदम मारहाण
विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरवण्यासाठी व्हिडिओ केला व्हायरल
Written by लोकसत्ता टीम

First published on: 14-10-2016 at 16:58 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two kendriya vidyalaya students brutally assaulting their classmate and video goes viral