आपल्या पतीचा मृत्यू कसा झाला? त्याचा मृतदेह कुठे गेला? याचं उत्तर शोधण्यासाठी एका महिलेने एक नाही दोन नाही तब्बल ८४ दिवस संघर्ष केला आहे. या संघर्षानंतर समोर आलेलं वास्तव आपल्या डोळ्यात पाणी उभं करेल यात शंका नाही. या जोडप्याला एक लहान मुलगाही आहे. आसामच्या प्रांजल मोरान आणि उर्वशी मोरान यांची ही बातमी आहे.

उर्वशीने दिलेला लढा, तिचा संघर्ष हा डोळ्यात अश्रू उभे करणाराच आहे. प्रांजल मोरान हा कोळसा खाणीत मजुरी करत होता. की कोळसा खाण अवैध होती. ६ जानेवारीला प्रांजल मोरान कामावर गेला होता. मात्र त्याच दिवशी तो बेपत्ता झाला. काही दिवसांनी उर्वशीला कळलं की आपला पती प्रांजल हा बेपत्ता झालेला नाही तर त्याचा मृत्यू झाला. हे समजल्यानंतर उर्वशीच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या पतीचं काय झालं? त्याचा मृत्यू कसा झाला? याचा शोध घेण्याचं उर्वशीने ठरवलं. उर्वशीचं म्हणणं हे आहे की १२ जानेवारीला तिचं आणि प्रांजलचं बोलणं झालं होतं. हे बोलणं आमचं शेवटचं होतं. तू चिंता करू नकोस मुलाची काळजी घे असं त्यांनी मला सांगितल्याचं उर्वशीने म्हटलं आहे. माघ महिन्यात येणाऱ्या बीहू हा उत्सवही साजरा करू असंही सांगितलं होतं. मात्र ते बोलणं शेवटचं ठरलं.

या घटनेनंतर एक माणूस २ फेब्रुवारीला उर्वशीला भेटायला आला. त्याने सांगितलं की हे पाच लाख रूपये घे. कारण तुझ्या पतीचा मृतदेह मी खाणीत पाहिला आहे. तो मृतदेह सडला आहे. त्यामुळे तो बाहेर काढणं शक्य नाही. तू जे काही घडलं ते विसर मी तुला पाच लाख रूपये द्यायला तयार आहे असं त्या व्यक्तीने सांगितलं. कोळसा खाणीत अशा घटना घडतातच असंही त्यने उर्वशीला सांगितलं. खाणीचा मालक पाच लाख रूपये द्यायला तयार आहे. लोकांनीही उर्वशीला सांगितलं की तू ते पैसे ठेवून घे. पण उर्वशीने कुणाचंच ऐकलं नाही आणि तिचा संघर्ष सुरू झाला.

उर्वशीने हे ठरवलं होतं की काहीही करून आपल्या पतीचा मृतदेह आपल्याला शोधायचा आहे. यासाठी उर्वशीला पोलीस ठाण्याला अनेक फेऱ्या मारल्यानंतर तिच्या प्रयत्नांनना यश आलं. तिनसुकिया जिल्हा उपायुक्त कार्यालयाबाहेर उर्वशीने धरणं आंदोलनही केलं. मात्र त्याचाही उपयोग झाला नाही तेव्हा उर्वशी आपल्या तीन वर्षांच्या मुलासह ५०० किमीचं अंतर कापत उर्वशी गुवाहाटीलाही पोहचली. तिथेही तिने धरणे आंदोलन केलं.

उर्वशीचं म्हणणं हे आहे की पोलीस अधिकाऱ्यांनी अखेर माझी मदत केली आणि आयजीपीने मागच्या शुक्रवारी माझ्या पतीचा मृतदेह माझ्या ताब्यात दिला. पतीचा मृत्यू झाल्यानंतर ८४ दिवसांनी तिने पतीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. उर्वशीला तिचा चुलत भाऊ मुदोई मोराननेही साथ दिली. पोलिसांनी उर्वशीच्या पतीचा मृतदेह शोधण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची मदत घेतली. प्रांजलचा मृतदेह ८४ दिवसांनी एका खोल कोळसा खाणीतून बाहेर काढण्यात आला. आज तकने यासंदर्भातल वृत्त दिले आहे.