तो आला..त्याने पाहिलं…आणि आपली ताकद दाखवून दिली. आपल्या वाटेत आलेल्या कारला या हत्तीने ढकलत पुढे नेलं…कार्टूनमधील कथेला साजेशी असणारी ही गोष्ट प्रत्यक्ष घडली आहे, तिही तमिळनाडूतील कोईम्बतुरमध्ये. जंगलात राहणाऱ्या या अवाढव्य प्राण्याने शहरात प्रवेश केला तेही मध्यरात्री. शहरी भागात येत या हत्तीने आपल्या वाटेत आलेल्या एका कारला चक्क ढकलत पुढे नेले. हत्तीमधील शक्ती आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. मात्र शरीराची ताकद न वापरता या हत्तीने आपल्या दोन सुळ्यांनी या कारला ढकलत पुढे नेले.
ही गोष्ट या भागात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. एएनआय या न्यूज एजन्सीकडून ही ३० सेकंदाची क्लिप अपलोड करण्यात आली आहे. सोमवारी रात्री १ वाजता हत्ती शहरात शिरला आणि त्याने आपल्या वाटेत आलेल्या कारला अशाप्रकारे ढकलत पुढे नेले.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार या हत्तीने काही घरांची कुंपणे देखील तोडली आणि काही गाड्यांचेही नुकसान केले. इतकेच नाही तर काही झाडेही या हत्तीने उध्वस्त केली. यानंतर घाबरलेल्या रहीवाशांनी वनविभागाशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी याठिकाणी धाव घेतली आणि हत्तीला पुन्हा जंगलात नेऊन सोडले.