Viral Video : आई आणि मुलाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, जिव्हाळा, काळजी आणि आपुलकी असते. असं म्हणतात, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” आईचे प्रेम, वात्सल्य आपल्याला कुठेच मिळत नाही. तिच्या मायेची तुलना केली जाऊ शकत नाही. कारण ती तिच्या मुलांवर जीवापाड व निस्वार्थ प्रेम करते. त्यागाची मूर्ती असलेली ही आई प्रत्येकासाठी प्रेरणा स्थान असते. आईशिवाय आपण आयुष्याची कल्पना करू शकत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका चिमुकल्याच्या वाटेला आयुष्यात सर्वात मोठं दु:ख आलं. या चिमुकल्याची आई देवाघरी गेली. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे, आईच्या वाढदिवशी हा चिमुकला हार घातलेल्या आईच्या फोटोसमोर केक कापताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एका चिमुकल्याच्या आईचा फोटो दिसेल. तिच्या फोटोला हार घातला आहे.. चिमुकला त्या फोटो शेजारी बसलेला आहे आणि केक कापत आहे. त्याची आई देवाघरी गेली आहे पण तो न चुकता आईचा वाढदिवस साजरा करत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आईच्या वाढदिवशी त्याने घर फुग्यांनी सजवले आहे. तिच्या फोटोवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जात आहे. हा चिमुकला आईबरोबर फोटो काढतो. आईचा वाढदिवस तो अगदी मनापासून आनंदाने साजरा करताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. काही लोकांना अश्रु आवरणार नाही. काही लोकांना त्यांच्या आईची आठवण येईल.
या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ही सगळी देवाघरची माणसं.. आपलं इवलुसं आयुष्य समृद्ध करायला पाठवली होती …न मागता दिली होती… न सांगता घेऊन गेला…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आई नसण्याचं दुःख फार वेगळं असतं” तर एका युजरने लिहिलेय, “देवा एक वेळ उपाशी ठेव पण कोणाच्या डोक्यावरून आई चं छत्र हिरावून नको घेऊस” आणखी एका युजरने लिहिलेय, “देव असा दिवस कोणालाच दाखवू नये” एक युजर लिहितो, “ज्याच्याकडे आई नाही त्यालाच त्याचं दुःख माहीत” आणखी एक युजर लिहितो, “देवा माझा भावाला खुश ठेव” अनेक युजर्सनी भावुक अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.