प्राणी जाम क्यूट असतात. त्यांना बोलता येत नसलं तरी आपल्या प्रेमाने ते आपल्याला त्यांचा लळा लावतात. ज्यांच्या घरात कुत्रा किंवा मांजर आहे, त्यांना ही बाब लगेच पटेल. या प्राण्यांची आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते. त्यांना फक्त प्रेम दिलं की ते त्यांच्या छोट्या आयुष्यात त्यांचं सर्वस्व तुम्हाला देतात. आपल्या घरातले हे प्राणी आपल्या आयुष्याचा भाग बनतात. आणि आपले कुटुंबीय, मित्रमैत्रिणी यांच्याएवढंच आपल्या भावनिक विश्वात त्यांना एक महत्त्वाचे स्थान मिळतं.

तसे हे प्राणी हुशारही असतात. आपल्या मालकाकडून केव्हा काय मिळवायचंय हे त्यांना पक्कं जाणवतं. आणि त्यानुसार ते मोजून मापून धिंगाणा घालतात. मांजरी याबाबतीत तरबेज मानल्या जात असल्या तरी कुत्रेपण काही कमी नाहीत. मांजरींचा आवाज एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जाऊ शकत नाही. पण कुत्रे घर डोक्यावर घेऊ शकतात.

सध्या नेटवर फिरणाऱ्या  या व्हिडिओमधल्या या ‘फ्रेंच बुलडाॅग’ला त्याचा मालक बसलेल्या सोफ्यावर चढायचं होतं. पण फ्रेंच बुलडाॅगचे पाय लहान असतात. या कुत्र्याला त्यामुळे या सोफ्यावर चढता येत नव्हतं. त्याची मजा करायची म्हणून त्याच्या मालकानेही त्याला मदत केली नाही. त्यावर या कुत्र्याने घातलेला मजेशीर गोंधळ पहा.


सौजन्य-यूट्यूब

हा व्हिडिओ खूपच क्यूट आहे. पण सुरूवातीला घाबरलेलं आणि काहीसं दु:खी दिसणारं कुत्र्याचं हे पिल्लू नंतर नंतर कसं व्यवस्थित गोंधळ घालतं पहिलंत ना?

शेवटी प्राण्यांनाही भावना कळतात. अनादी काळापासून माणसाच्या सहवासात असणाऱ्या कुत्रे आणि मांजरांच्या बाबतीत तर हे आणखी खरं ठरतं. या आपल्या ‘सेन्स’चा वापर करत आपल्या मालकांकडून पाहिजे ते घेण्याइतकी ही मंडळी नक्कीच वस्ताद असतात.

पण याच सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे या सगळ्या प्राण्यांचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटतो.